Anil Bonde on Nana Patole : महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अयोध्येला प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं जाहीर केलं. त्यावर भाजप (BJP) नेते आणि माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी कॉंग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ट्वीट करून टीका केली आहे. सोबतच काशी येथील भगवान विश्वनाथ, ज्ञानव्यापी मशिदीमध्ये (Gyanvapi Row) सापडलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेण्याचा सल्लासुद्धा दिला आहे. 


भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उशिरा का होईना, पण आपल्या चेल्याचपाट्यासह प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेण्याकरिता जात आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. उशिरा का होईना, पण शहाणपण सूचलं. परंतु अजूनही राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हे का सुचल नाही? त्या अगोदर नानांनी पावलं टाकली. कदाचित नाना पटोले भाजपमध्ये होते, त्याचाच हा परिणाम असेल, असंही बोंडे म्हणाले आहेत. अयोध्येला आता नाना जातच आहेत, तर त्यांनी काशीलासुद्धा जावं, काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉरीडोअर उभारला आहे. त्याचा आनंद घ्यावा आणि मथुरेला पण जावं प्रभू श्रीकृष्णाच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घ्यावं. सोबतच ज्ञानव्यापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचंही दर्शन घ्यावं. श्रीराम, श्रीकृष्ण, भोलेनाथ, विश्वनाथ शिवशंकर हा भारतीयांचा लोकांचा आत्मा आहे. या तिन्ही ठिकाणी मुस्लिम आक्रमकांनी आक्रमणं केली, मंदिरं तोडली आणि मशिदी बांधल्या, संपूर्ण भारतीयांचा अपमान केला. आत्मसन्मानासाठी सर्व भारतीयांचा संघर्ष शेकडो वर्षांपासून सुरूच आहे. अनेक लढाया झाल्या पण हे शल्य कायम हृदयात राहील."



"प्रभू श्रीराम चंद्राची अयोध्या कारसेवकांनी मुक्त केली. बाबरी पाडली. सर्वोच न्यायालयाच्या आदेशानं श्रीराम मंदिर उभारलं जात आहे. म्हणूनच श्रीराम मंदिराला विरोध करणारे कपिल सिब्बलच्या पक्षाचे नाना पटोले दर्शनाला जाऊ शकत आहेत. आता सर्व भारतीयांची आस्था आहे की, काशी विश्वनाथ आणि श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे. विकृत धर्माधांनी तिथे बांधलेल्या वास्तू दूर करून पुन्हा वैभवी आत्मगौरवाचे विश्वनाथ मंदिर आणि श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर निर्माण व्हावी. आणि आता तर ज्ञानव्यापी मशिदीमद्धेही शिवलिंग सापडले. अनेक मुर्ती आढळल्या तसेच सर्व मंदिराच्या आकृत्या मथुरेतील मशिदीमध्ये आहेत. म्हणून कॉंग्रेसच्या नानांनी काशी विश्वनाथला जावं. ज्ञानव्यापी पाहुन मूळ जागेवर काशी विश्वनाथ मंदिराची मागणी करावी. मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मशिदीपासून मुक्त करण्याची मागणी करावी. असं नाना पटोले करणार नसेल तरी भारतातील आत्मगौरवी कोट्यवधी जनता ही मागणी भविष्यात करणारच आहे आणि त्याला नानाच काय त्यांची काँग्रेसी पिलावळसुद्धा रोखू शकणार नाही." अशा आशयाचं ट्वीट भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी करून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करून सल्लाही दिला आहे.