मुंबई : सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद न घेतल्याने काँग्रेसचे नुकसान झाले आहे असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय पक्ष नेतृत्व याबाबतीत विचार करेल अशी आशा आहे, असं ठाकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. काँग्रेसने नेहमी सामाजिक संतुलनाचा विचार केला आहे, असंही ते म्हणाले. सध्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत सुरु असलेल्या चर्चेवर ते म्हणाले की, ओबीसी आणि विदर्भातून या कॉम्बिनेशनवर निवड अशी चर्चा आहे. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी शासकीय पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तींनी अशा पदावर नसलं पाहिजे या मताचा मी आहे, असंही ते म्हणाले. एकाच वेळी पक्ष आणि सरकार यात पक्षाला न्याय देता येत नाही, पक्ष हा कायम प्राधान्य असला पाहिजे, असंही माणिकराव ठाकरे म्हणाले.


नाना पटोले यांचं नाव आघाडीवर
प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करताना नाना पटोले कसे राहतील अशी विचारणा प्रभारी एच के पाटील करत होते. त्यामुळे नाना पटोले यांच्या नावाला हायकमांडचा ग्रीन सिग्नल मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. काँग्रेस खासदार आणि सध्या गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांचंही नाव शर्यतीत आहे. त्यामुळे बिगरमराठा चेहरा देण्याबाबत काँग्रेसचा निर्णय अंतिम राहतो की ऐनवेळी आणखी कुठलं नाव समोर येतं याचीही उत्सुकता असेल. दरम्यान दोन दिवस मुंबईत तातडीच्या बैठका खलबतं झाल्यानंतर दिल्लीत मात्र एच के पाटलांच्या बैठका थंडावल्या. काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपद, प्रदेशाध्यक्षपद, महसूलमंत्रीपद या तीनही पदांची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याने बदलाची ही प्रक्रिया सुरु झाली होती. नाना पटोले याचं नाव सध्या शर्यतीत आघाडीवर आहे. नाना पटोले हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात सरकार सध्या तीन पक्षांचं आहे, त्यामुळे या बदलाबाबत सत्तेत सहभागी असलेल्या इतर पक्षांचं काय मत राहतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल.


Maharashtra Congress President : महाराष्ट्र काँग्रेसचा नव्या नेतृत्वाचा शोध बिगर मराठा चेहऱ्यांवर केंद्रीत? काय आहेत कारणं


बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलासाठी खलबतांना वेग आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नाव सुचवा असं आवाहन प्रदेश काँग्रेस प्रतिनिधींना करण्यात आलं होतं. एचके पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती ॲप द्वारे हे डिजिटल मतदान घेतलं जात आहे. महाराष्ट्रात 557 प्रदेश प्रतिनिधी आहेत. प्रत्येकाला पसंतीक्रमानुसार मत नोंदवायला सांगितले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी नुकतंच महाराष्ट्रात येऊन काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा कल जाणून घेतला होता.


EXCLUSIVE | एच के पाटील यांची थोरात आणि चव्हाणांशी चर्चा, काँग्रेसच्या बैठकीत काय काय झालं?


शोध बिगर मराठा नेतृत्वावर केंद्रीत?
महाराष्ट्रात काँग्रेसनं नव्या नेतृत्वशोधाच्या हालचाली सुरु केल्यात. हा शोध बिगर मराठा नेतृत्वावर केंद्रीत होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात यांनी स्वत:च राजीनाम्याची तयारी दाखवल्यानंतर महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या राज्यातल्या तीन बड्या काँग्रेस नेत्यांशी त्यांनी खलबतं केली. काँग्रेसचे मागचे दोनही प्रदेशाध्यक्ष मराठा समाजातले आहेत. नुकतेच मुंबई काँग्रेस अध्यक्ष नेमले गेलेले भाई जगताप हेही मराठाच आहे. नवा प्रदेशाध्यक्षही मराठाच नेमला तर सीएलपी, मुंबई अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशी तीनही पदांवर मराठा होईल. त्यामुळेच बदल करायचाच असेल तर जातीय संतुलनात मग बिगर मराठा चेहरा देण्याची गरज आहे अशी सूचना एका ज्येष्ठ नेत्यानं या बैठकीत केली होती.