नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपलं नाव चर्चेत असल्यामुळे आपलं पासपोर्ट प्रकरण टायमिंग साधत काढण्यात आलं, असा गंभीर आरोप मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काल अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी एबीपी माझाशी एक्स्ल्युझिव्ह बातचित केली. त्यावेळी बोलताना पक्ष जी जबाबदारी देईल ती स्विकारण्याची माझी तयारी आहे, असंही म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "पासपोर्ट प्रकरण उकरुन काढणं म्हणजे, किरकोळ आहे. त्यात एवढं काही नाही. राजकारणात बदनामीच षडयंत्र करणं सुरुच असतं. त्यामध्ये एवढा मोठा विषय नाही. पण टायमिंग साधला गेलाय. शेवटी राजकारण आहे, राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपण कोणावर आरोप करण्यापेक्षा आपल्या हातून काय चुका झाल्यात त्यावर चर्चा करुन चुका होऊ नयेत म्हणून पुढे जाणं हा राजकारणातील गुणधर्म आहे."
विजय वडेट्टीवार बोलताना म्हणाले की, "मराठा आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली. एकूण मराठा आरक्षणासंदर्भात 25 जानेवारीला जी सुनावणी पार पडणार आहे. कदाचित ती अंतिम सुनावणी असले, त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण शरद पवारांना भेटले होते." पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, "चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावतीजवळ सरकारची शासकीय एमआयडीसीची 3 हजार एकर जमीन आहे. ती पूर्वी एका पॉवर प्रोजेक्टसाठी देण्यात आली होती. पण तो प्रोजेक्ट उभा न राहिल्यामुळे ती जागा आता एमआयडीसीच्या मालकीची झाली आहे. अशा परिस्थिती तिथे एक मोठा प्रोजेक्ट यावा, जागा उपलब्ध आहे, रेल्वे ट्रॅक आहे, वीज आहे, यासंदर्भात विनंती करण्यासाठी मी आणि अशोक चव्हाण शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलो होतो. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. एकूण विकासाच्या संदर्भात ती चर्चा होती."
पाहा व्हिडीओ : विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र?
शरद पवार यांच्या भेटीनंतर आम्ही वेणुगोपाळ यांची भेट घेतली. तिथे मात्र महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "मला कळतंय की, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी माझं नाव चर्चेत आहे. तरी जी काही जबाबदारी पक्ष देईल ती जबाबदारी मी नक्की पार स्विकारेल. शेवटी यासंदर्भातील निर्णय हा हायकमांडचा आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदा संदर्भात मला अनेक चर्चा ऐकू येत आहेत. काँग्रेस पक्ष हा नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिला असून काँग्रेसची भूमिका नेहमीच जातीपातीच्या पलिकडे राहिली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो या सर्व गोष्टींचा सारासार विचार करुनच घेतील. तसेच अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींचाच असेल."