मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (14 फेब्रुवारी) विधानभवनात काँग्रेस आमदारांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, एकूण आमदारांपैकी 12 आमदार बैठकीसाठी उपस्थित नसल्याने काँग्रेसमध्येही फोडाफोडीचा खेळ होणार का? याची चर्चा रंगली आहे. अशोक चव्हाण यांच्याबरोबर मराठवाड्यातील काही आमदार देखील काँग्रेस सोडणार? अशी चर्चा रंगली आहे. आजच्या बैठकीला केवळ 25 आमदार उपस्थित होते. राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीतही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली होती, पण दगाफटका झाल्याने त्यांचा पराभव झाला होता. 


दरम्यान, उद्या (15 फेब्रुवारी) देखील काँग्रेस आमदरांची विधानभवनात सकाळी साडे नऊला बैठक बोलावली आहे.त्यामुळे या बैठकीत, तरी सर्व काँग्रेस आमदार उपस्थित राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यसभा उमेदवार म्हणून चंद्रकांत हांडोरे यांची निवड झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. 


आमदारांच्या दांडीवर बाळासाहेब थोरात काय म्हणाले? 


आमदारांच्या दांडीवर काँग्रेस बाळासाहेब थोरात यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, उद्या रीतसर बैठक बोलवली आहे.  मराठा आरक्षणावर 20 तारखेला एकदिवसीय अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्याबाबत ही चर्चा उद्या करणार आहोत. ते पुढे म्हणाले की, मला वाटतं नाही की आणखी उमेदवार देतील आणि निवडणूक होईल. 


मित्र पक्षांसोबत संवाद होत असून सर्वजण व्यवस्थित आहेत. सुरळीत मतदान होईल. राज्यसभेला दिलेल्या सहापैकी 3 तर काँग्रेसचेच आहेत. त्यांना काँग्रेसची किती गरज आहे हे दाखवत आहेत. भारतीय जनता पक्षकडे उमेदवार नाहीत म्हणून हे घ्यावे लागतात. शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि समाजवादी आमच्या सोबत आहेत. राज्यसभेत जाण्यासाठी योग्य होते म्हणून हांडोरे यांची निवड झाली असल्याचे ते म्हणाले.  झिशान आमच्या सोबत असून वडिलांचं माहीत नसल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या