Narayan Rane : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती विरोधात महाप्लॅन सुरू असतानाच अशोक चव्हाण काँग्रेसकडून सर्व बैठकांमध्ये हजर होते. मात्र तेच अशोक चव्हाण आता भाजपमध्ये सामील झाल्याने महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांना राज्यसभेची उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली. त्यामुळे देव पाण्यात घालून बसलेल्यांना आता पुन्हा एकदा वाट पाहण्याची वेळ आली आहे. 


नारायण राणेंचा राज्यसभेतून पत्ता कट 


दुसरीकडे भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा धक्का बसला असून त्यांचा राज्यसभेतून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरावं लागणार आहे. भाजपकडून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित समजली जात आहे. उमेदवारी मिळाल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात त्यांची शड्डू ठोकतील. विनायक राऊत हे गेली दोन टर्म रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आहेत. विनायक राऊत यांना शह देण्यासाठी नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल.


अशोक चव्हाण आणि नारायण राणे पुन्हा भाजपमध्ये आमनेसामने 


दरम्यान, कधीकाळी काँग्रेसमध्ये असणारे अशोक चव्हाण आणि नारायण राणे पुन्हा भाजपमध्ये आमनेसामने आले आहेत. त्यामुळे त्यांच्या जुन्या वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी सातत्याने अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते इतकंच नव्हे तर नारायण राणेला अडचणी निर्माण करणे हेच अशोक चव्हाणांसमोर काम असल्याची टीका त्यांनी केली होती. 






शरद पवार गटाकडून व्हिडिओ ट्विट 


आता तेच अशोक चव्हाण त्यांच्यासमोर भाजपकडून राज्यसभेवर जात आहेत. पक्षात प्रवेश करताच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नारायण राणेंचा पत्ता कट झाला आहे. नेमकी हीच संधी साधत दोघांमधील जुन्या वादाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम करताना अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप केले होते. त्याचाच व्हिडिओ एडिट करून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शेअर करण्यात आला आहे. नारायण राणे यांनी 2017 मध्ये एक पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. 


पियूष गोयल आणि भागवतराव कराडही लोकसभेच्या रिंगणात 


दुसरीकडे, पियूष गोयल आणि भागवतराव कराड या दोन राज्यसभेतील खासदारांना यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पियूष गोयल यांना मुंबईतील सुरक्षित मतदारसंघ दिला जाण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या