मुंबई : एनआरसी आणि सीएएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आलीय. व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरून नागरिकांनी सीएए व एनआरसीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. डीएनए आधारित एनआरसी करा, सीएए हटवा, देश वाचवा या प्रमुख मागण्या भारत बंद आंदोलनात करण्यात आल्या आहेत. या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. तर, एकदोन ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला.


बहुजन क्रांती मोर्चाने सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी याविरोधात आज भारत बंदची आज हाक दिली आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांनी कुठल्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा ठराव केला. त्याचाही या बंदवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

पुणे -
भारत बंदनिमित्त पुण्यातील कोंढव्यात बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमुळं वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळं काही मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलीय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठी खबरदार घेतली होती. जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला नाही, त्यामुळे व्यापारी प्रतिष्ठानं सुरू होती. बंद समर्थकांनी ठिकाणी आव्हान केल्यानंतरही अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने बंदच केली नाहीत. संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांना बंदोबस्तात वाढ करावी लागली.

अहमदनगर -
या बंदला अहमदनगरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. नगरमधील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. इतकेच नाही तर शहरातील शिवाजी महाराज चौकात बहुजन क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नागरिकत्व कायद्याला तीव्र विरोध करत सरकारच्या या कायद्याचा निषेध करण्यात आला.

नंदुरबार -
जिल्ह्यात बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहादा शहरात संमिश्र बंद ठेवण्यात आला, तर नंदुरबारमध्ये अनेक ठिकाणी व्यवहार सुरळीत होते. मुस्लीम बहुल भागांमध्ये मात्र या बंदचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. या भागातील सर्व दुकाने बंद होती. हा बंद शांततेत पार पडावा यासाठी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे दुपारपर्यंत कुठलीही अप्रिय घटना या बंद दरम्यान घडलेली नाही.

लातूर -
बंदला लातूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला नाही. दरम्यान, बंद समर्थकांनी आवाहन केल्यानंतरही अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली नाहीत. त्यामुळे संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांना बंदोबस्तात वाढ करावी लागली. लातूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट चाकूर, या भागात अनेक ठिकाणी बाजारपेठा सुरु होत्या.

यवतमाळ -
यवतमाळ शहरातील मेन लाईनमध्ये बंद करण्यावरुन पोलिसांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. पोलिसांनी यावेळी मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज केला. शहरातील मेन लाईन परिसरात सध्या तणावाची परिस्थिती आहे.

ठाणे -
बदलापुरात भारत बंदसाठी पत्रकं वाटताना बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. शिवाजी चौकात एका गाडीतून आलेल्या 4 ते 5 जणांनी हॉकी स्टिक आणि रॉडने मारहाण केली. मारहाण करताना पत्रकं फाडल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या कार्यकर्त्याने केलाय.
धुळे -
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातही भारत बंदला हिंसक वळण लागलं. शिरपूर-पानसेमल या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत दोन प्रवासी जखमी झाले. बसवर दगडफेक केल्यानंतर आंदोलकांनी बंद मागे घेतला.

अकोला -
जिल्ह्यातील पातूर शहरात संतप्त जमावाने एका खासगी मालवाहू वाहनाच्या काचा फोडल्यात. ट्रक जाळण्याचा प्रयत्नही यावेळी जमावानं केला. तर, काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे या जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांना लाठीमारही करावा लागला.
पालघर -
पालघरमध्येही भारत बंदवेळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करावा लागला. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतलंय. बंदवेळी दुकानं बंद करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

परभणी -
भारत बंदला परभणीमध्ये प्रतिसाद मिळत आहे. परभणी जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यासह पाथरी, मानवत, जिंतुर, पुर्णा तालुक्यांमध्येही बंद पाळण्यात आलाय. अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयही सोडून देण्यात आली आहेत.

सांगली -
सांगलीतील मिरजमध्ये तरुणांनी रिक्षाच्या काचा फोडल्या आहेत. मिरजेतील कॅन्सर रुग्णालयासमोरील रस्त्यावर तरुणांनी जबरदस्तीनं रिक्षा वाहतूक बंद केली. तरी, पोलिसांनी रिक्षाची तोडफोड करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगला चोप देत दोघांना ताब्यात घेतलं आहे.

जालना -
जालन्यातील परतूर येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी नागरिक सुधारणा कायद्याविरोधात रेल्वे स्थानक परिसरातून विशाल मोर्चाही काढण्यात आला. हजारो नागरिकांचा या मोर्चात सहभाग पाहायला मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठाही सकाळपासून बंद होत्या.

अमरावती -
अमरावतीच्या इर्विन चौकात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यातच पोलिसांनी दुचाकी उचलल्याने काही काळीसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. इर्विन चौकातली संपूर्ण व्यापार पेठ बंद आहे.

संबंधित बातमी - महाराष्ट्रामध्ये कोणतेही बंद व्यापारी पाळणार नाहीत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा ठराव

Bharat Bandh | भारत बंदला हिंसक वळण, सांगलीत रिक्षाच्या काचा फोडल्या | ABP Majha