सांगली : कोल्ड स्टोअरेज मालकांनी सांगलीतील बँक ऑफ बडोदा बँकेला 23 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेला शेतमाल मालकांनी परस्पर विकला आहे. या प्रकरणी बँकेने सांगली शहर पोलिस ठाण्यात सहा कोल्ड स्टोअरेजसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेतकर्‍यांनी हळद आणि बेदाणा तारण ठेवून कर्ज उचललं. या शेतमालाची सांगलीतील सहा कोल्ड स्टोअरेज मालकांनी परस्पर विक्री केली. त्यातून बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेला 23 कोटी 12 लाख 74 हजार रुपयांचं नुकसान झालं.

सांगली जिल्ह्यातील कवठेएकंद, भोसे, मालगाव, सांगलीमधील कोल्ड स्टोअरेजमध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेली हळद आणि बेदाणा आदी शेतमाल मालकांनी परस्पर विकल्याचा प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांनी बँक ऑफ बडोदामधून सदर शेतीमालावर तारण कर्ज घेतलं होतं आणि हा शेतीमाल कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आला होता. कर्ज असल्यामुळे हा शेतीमाल बँकेच्या संगनमताने परस्पर विकून तब्बल 23 कोटी 12 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा कोल्ड स्टोअरेजच्या दहा मालकांविरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.


47 शेतकर्‍यांनी कोल्ड स्टोअरेजमध्ये शेतीमाल ठेवून बँकेकडून 40 लाखांपासून ते एक कोटी रुपयांर्यंत कर्ज घेतलं आहे. अचानक त्यांनी कर्जाचे हफ्ते भरायचे बंद केले. सीएनएक्स कंपनी आणि शेतकर्‍यांनी संगनमत करुन हळद आणि बेदाण्याची परस्पर विक्री केल्याचा बँकेचा संशय आहे. शेतकर्‍यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. फसवणुकीचा आकडा 23 कोटींच्या घरात असल्याने पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेऊन सर्व कागदपत्रे गुन्हे शाखेकडे वर्ग केली आहेत.

मुंबईतील सीएनएक्‍स कार्पोरेशन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार निरुपमा पेडुंरकर, त्याच कंपनीचे पश्‍चिम विभागाचे प्रमुख अजित नारायण जाधव यांच्यासह साई अॅग्रोटेक कोल्ड स्टोअरेज आणि राधाकृष्ण कोल्ड स्टोअरेजचे दीपक मधुकर गुरव, कवठेएकंद लक्ष्मी अॅग्रो कोल्ड स्टोअरेजचे संचालक आणि भागीदार पवनकुमार आदिनाथ चौगुले, जयपाल बाबू शिरगावे, लखमगौंडा जिगौंडा पाटील, रुपाली वृषभनाथ शेडबाळे, अभ्युदया कोल्ड स्टोअरेजचे प्रद्युम्न बाळगौंडा पाटील, बीएल कोल्ड स्टोअरेजचे राहुल दिनेश मित्तल, गोमटेश कोल्ड स्टोअरेजचे अनिल पारिसा सुगन्नावर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.