Tiware Dam Breached | तिवरे धरणाला तडे गेल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती : महाजन
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2019 10:16 AM (IST)
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं. या घटनेत सहा जणांचे मृतदेह सापडले असून 19 जण बेपत्ता आहेत.
मुंबई/रत्नागिरी : चिपळूणमधील तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली होती, अशी कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तसंच धरण फुटीप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत असंही महाजन यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं. या घटनेत सहा जणांचे मृतदेह सापडले असून 19 जण बेपत्ता आहेत. अलोरे-शिरगाव पोलिस चौकीच्या हद्दीत मंगळवारी (02 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. भेंडेवाडी, तिवरे, आकले, कादवड, नांदिवसे, दादर, गानेखडपोली या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. याविषयी गिरीश महाजन म्हणाले की, "ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. दापोली लघुपाटबंधारे विभागाचं हे छोट धरण होतं. आतापर्यंत सहा मृतदेह हाती लागले आहेत. गावकऱ्यांनी धरण फुटल्याची, गळत असल्याची तक्रार केली होती. जलसंपदा खात्यांतर्गत हे धरण येत असल्याने दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनीही दुरुस्ती केली असं उत्तर दिलं होतं. परंतु आता या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत." "आता या धरणाच्या आजूबाजूच्या गावांना धोका नसल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं. धरण आता रिकामं झालं आहे. धरण फुटल्यानंतर सर्वात मोठा तडाखा जवळच्या पहिल्याच गावाला बसला. या गावातील काही घरं वाहून गेली आणि त्यासोबत 24-25 जण बेपत्ता झाले. त्यापैकी सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर इतर गावातील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं असून आवश्यक मदत पुरवली जात आहे," असंही गिरीश महाजन यांनी नमूद केलं. "मुख्यमंत्री रात्रीपासून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. मी स्व: तिथे जाणार आहे. दुरुस्ती झाल्याचं अधिकारी सांगत आहे. परंतु या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच बेघरांना मदत दिली जाईल," असंही महाजन म्हणाले. दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती तिवरे धरण हे दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतं. 2000 साली या धरणांचं बांधकाम पूर्ण झालं. 20 लाख क्युबिक मीटर पाणीसाठी मावेल एवढी या धरणाची क्षमता आहे. परंतु मागील काही वर्षात या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. अनेक गावांना या धरणाच्या पाण्याचा पिण्यासह शेतीसाठी उपयोग होतो. दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती, पण गेल्या वर्षी गळतीत वाढ झाली. बेपत्ता लोकांची नावं अनंत हरिभाऊ चव्हाण (वय 63 वर्ष) अनिता अनंत चव्हाण (वय 58 वर्ष) रणजित अनंत चव्हाण (वय 15 वर्ष) ऋतुजा अनंत चव्हाण (वय 25 वर्ष) दुर्वा रणजित चव्हाण (वय 1.5 वर्ष) आत्माराम धोंडू चव्हाण (वय 75 वर्ष) लक्ष्मी आत्माराम चव्हाण (वय 72 वर्ष) नंदाराम महादेव चव्हाण (वय 65 वर्ष) पांडुरंग धोंडू चव्हाण (वय 50 वर्ष) रवींद्र तुकाराम चव्हाण (वय 50 वर्ष) रेश्मा रविंद्र चव्हाण (वय 45 वर्ष) दशरथ रविंद्र चव्हाण (वय 20 वर्ष) वैष्णवी रविंद्र चव्हाण (वय 18 वर्ष) अनुसिया सीताराम चव्हाण (वय 70 वर्ष) चंद्रभागा कृष्णा चव्हाण (वय 75 वर्ष) बळीराम कृष्णा चव्हाण (वय 55 वर्ष) शारदा बळीराम चव्हाण (वय 48 वर्ष) संदेश विश्वास धाडवे (वय 18 वर्ष) सुशील विश्वास धाडवे (वय 48 वर्ष) रणजित काजवे (वय 30 वर्ष) राकेश घाणेकर (वय 30 वर्ष)