chandrakant patil : शिवसेना खासदार संजय राऊत हे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असे आपण वारंवार सांगत होतो. ते कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी लगावला. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व शहराध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक तुरुंगात गेले. परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने चौकशी केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक नेत्यांवर कारवाया केल्या त्यावेळी शरद पवार यांना पंतप्रधानांना भेटून हा अन्याय आहे व तो थांबवा असे सांगायचे सुचले नाही. परंतु, इतरांच्या बाबतीत निरीच्छ असणारे शरद पवार मात्र संजय राऊत यांच्या गळ्याशी प्रकरण आल्यानंतर मोदीजींची भेट घेतात. याच्यावरूनच आपण संजय राऊत यांच्याविषयी जे बोलत होतो ते स्पष्ट होते.


त्यांनी सांगितले की, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव दिसू लागल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी लोकांना आवडतील अशा योजनांचा उल्लेख करायला सुरुवात केली आहे. त्यातून ते पाईपलाईनच्या योजनेच्या चाचणीचे वेळापत्रक जाहीर करत आहेत. परंतु, हे केवळ निवडणुकीसाठी आहे. लबाडाच्या घरचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही, असे याबाबतीत आहे.


शाहू मिलमध्ये शाहू स्मारक उभारण्याचा विषय पालकमंत्र्यांना आता आठवला आहे. पण सत्तेमध्ये असताना गेली सव्वादोन वर्षे त्याना याबाबतीत काम करण्यास कोणी रोखले नव्हते. निवडणुकीत चुरस असली तरी भाजपा नक्की निवडणूक जिंकेल. पराभवाच्या भितीने दादागिरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी ध्यानात घ्यावे की बॉल जितका आपटावा तितका तो उसळून वर येतो, असा इशारा त्यांनी दिला.


पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबद्दल टीका करण्यापेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यात या दोन्हीवरील व्हॅट कमी करण्यास सांगावे. देशातील २२ राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात नागरिकांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातही कर कमी केल्यामुळे कमी दर आहे, असे ते म्हणाले.


कोथरूड मतदारसंघात आपल्याबद्दल रात्री पोस्टर लाऊन पळून जाण्यापेक्षा हिंमत असेल तर समोर येऊन विकासकामांबद्दल जाहीर चर्चा करा. आपण कोथरूड विधानसभा मतदारसंघ आणि पुण्यासाठी काय काम करत आहोत, हे लोकांना माहिती आहे, असे आव्हान त्यांनी दिले.