चंद्रपूर : राज्यात अनलॉक 2 (Maharashtra Unlock) नंतर हळूहळू उद्योगधंदे सुरळीत होण्यास सुरुवात झाली. विदर्भात देखील हळूहळू उद्योगाची गाडी रुळावर येऊ लागली होती. मात्र या उद्योगांना पुन्हा एकदा ऐन दिवाळीत ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण आहे उद्योगांपुढे उभं ठाकलेलं कोळश्याचं संकट (Coal crisis)...
राज्यातील उद्योगांपुढे मोठं संकट
काही दिवसांपूर्वी देशात कोळश्याच्या टंचाईमुळे वीज उत्पादन क्षेत्रापुढे मोठं संकट उभं झालं होतं. देश अंधारात जातो की कशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र सरकारने तातडीने सर्व कोळसा खदानीतील कोळसा वीज केंद्रांकडे वळता केला आणि हे संकट टळलं. मात्र आता यामुळे राज्यातील उद्योगांपुढे मोठं संकट निर्माण झालं आहे. सध्या राज्यातील सर्व कोळसा हा वीज निर्मितीसाठी प्राथमिकतेने दिल्या जात असल्यामुळे उद्योगांपुढे मोठं संकट निर्माण झालंय.
92 टक्के कोळसा वीज कंपन्यांना
मध्य भारतात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ही सरकारी कोळसा कंपनी कोळसा उत्खननाचं काम करते. ही कंपनी महिन्याला सरासरी 4.3 मिलियन टन कोळसा काढते मात्र गेल्या 3 महिन्यात पावसामुळे हे उत्पादन 3 मिलियन टन ते 4.2 मिलीयन टन इतकं झालंय. त्यातही सध्या सर्व कोळसा हा वीज कंपन्यांना देण्यात येत असल्यामुळे विदर्भातील उद्योगांना कोळसा पुरवठा ठप्प झालाय. WCL च्या एकूण उत्पादनापैकी 92 टक्के कोळसा हा वीज कंपन्यांना तर 8 टक्के हा उद्योगांना दिला जातो. मात्र सध्या उत्पादनात आलेल्या तफावतीमुळे विदर्भातील उद्योगांना कोळसा मिळत नाही आहे. तर दुसरीकडे WCL चा कोळसा उपलब्ध होत नसल्याने या उद्योगांना खुल्या बाजारातून कोळसा विकत घ्यावा लागतोय. टंचाई मुळे खुल्या बाजारात कोळश्याचे भाव 7 हजार रुपये टनवरून 13 हजारांपर्यंत गेले आहेत. सोबतच कोळश्यात भेसळ देखील होत आहे.
कोळश्याच्या या संकटामुळे विदर्भातील 400 छोटे-मध्यम आणि 25 मोठ्या उद्योगांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्टील, पेपर, केमिकल, सिमेंट या सारख्या उद्योगांना फरनेस आणि बॉयलरसाठी कोळश्याची गरज असते मात्र कोळश्या अभावी हे फरनेस आणि बॉईलर लवकरच विझण्याची शक्यता आहे. राज्य आणि केंद्र सरकारने यावर तातडीने उपाय न काढल्यास ऐन दिवाळीत उद्योगांपुढे मोठं संकट उभं राहणार असल्याची शक्यता आहे.