सिंधुदुर्ग :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील वायंगणी, तोंडवळी या भागात सी वर्ल्ड प्रकल्प प्रस्तावित केला होता. मात्र आता नारायण राणे (Narayan Rane)केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नाणार आणि सी वर्ड हे दोन्ही प्रकल्प प्रस्तावित जागेवर आणि आहे तेवढ्या क्षेत्रात होणार असल्याचे सांगितले. यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणेंना हिंमत असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्प रेटूनच दाखवा असं खुल आव्हानच दिलं आहे. नारायण राणेंचा जीव सी वर्ल्डमध्ये  गुंतलेला आहे. 300 एकर मध्ये सी वर्ल्ड करायचा आणि 1400 एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेल उभी करायची, हा धंदा नारायण राणे यांचा होता. त्यापासून ते दूर गेलेले नाहीत. हा त्यांचा प्रयत्न चालूच राहणार आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. 


राऊत यांनी म्हटलं आहे की, कोणत्याही परिस्थितीत वायंगणी, तोंडवळी गाव उध्वस्त करून सी वर्ल्ड होणार नाही म्हणजे नाही. नाणार रिफायनरी बाबत नारायण राणे यांना जनाची नाही तर मनाची काहीतरी लाज वाटली पाहिजे. नाणार रिफायनरी होता कामा नये म्हणून संपूर्ण देवगड मधून गाड्याच्या गाड्या भरून मोर्चे काढले होते. त्यावेळी भाजप सरकारवर टीका देखील केली होती, असं विनायक राऊतांनी म्हटलं आहे.  


कलेक्शन कसं करायचं, कसं लुबाडायचं हा अनुभव नारायण राणे यांच्या पाठिशी 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर शिवसेनेचा कलेक्शन करणारा मंत्री म्हणून आरोप केला होता. यावर आज विनायक राऊत यांनी थेट राणेंवर टीका केली आहे. नारायण राणे यांना अशा सगळ्या शब्दांची चांगली ओळख आहे. मंत्री पदाचा वापर करून कलेक्शन कसं करायचं आणि त्रास देऊन त्यांना कसं लुबाडायचं हा अनुभव नारायण राणे यांच्या पाठिशी मोठा असल्यामुळे स्वतःच्या अनुभवावरुन अनिल परब यांची तुलना करत आहेत. दोन दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत महागाई भता वाढ करण्याची जबरदस्त ऐतिहासिक निर्णय अनिल परब यांनी घेतलाय. त्यामुळे हा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणारा आहे. अशा पद्धतीचा निर्णय नारायण राणे यांच्या कारकिर्दीत घेतला नाही त्यामुळे त्यांची ती  पोटदुखी आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.