Bigg Boss, Shivleela Patil : Buldana : बिग बॉसमध्ये भाग घेतल्यानं चर्चेत आलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील (Kirtankar Shivalila Patil) यांचं कीर्तन आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवरात्रीनिमित्त देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळानं शिवलीला पाटील यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. त्याला मोठी गर्दी जमली. त्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्यानं आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


शिवलीला पाटील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्यानं वारकरी संप्रदाय आणि वारकरी संघटना त्यावर नाराज होत्या. त्याशिवाय, बिग बॉससंदर्भात माफी मागत नाही तोपर्यंत शिवलीला पाटील यांच्या किर्तनावर बहिष्कार टाकण्याचं आवाहनही काही कीर्तनकार संघटनांनी केलं होतं. दरम्यान, वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्यानं शिवलीला पाटील यांनी एबीपी माझाशी बोलतानाच वारकरी संप्रदाय आणि वरिष्ठांची माफी मागितली होती.


जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्यानं महिला कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचं आयोजन केलं म्हणून आयोजकांविरोधात विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवलीला पाटील या बिग बॉस मराठी सिझन 3 च्या माजी स्पर्धक आहेत. त्या कीर्तनासाठी आल्या होत्या. यावेळी प्रचंड गर्दी झाली. दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे आयोजन महागात पडलं. याप्रकरणी तिघांविरुद्ध बुलडाणा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला. पण, आयोजकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत कीर्तनाचे आयोजन केलं.


पाहा व्हिडीओ : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर कीर्तनकार शिवलीला पाटील पहिल्यांदाच ‘माझा’वर



पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी जमवू नये, असे आदेश बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी दिले होते. देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा मंडळ यांच्या वतीने पाटील यांचे कीर्तन आयोजित केले. यावेळी कीर्तनास 200 हून अधिक लोक जमले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी सरकारतर्फे पोलिसांत तक्रार दिली. मंडळाचे आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.


दरम्यान, वारकरी सांप्रदायानं आणि विश्व वारकरी सेनेनं शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाला विरोध केला आहे. जोपर्यंत शिवलीला पाटील या बिग बॉस संदर्भात माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या किर्तनावर बहिष्कार टाकावा असंही काही कीर्तनकार संघटनांचे म्हणणे आहे.


बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक : शिवलीला पाटील 


कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक. मात्र, आपल्या धर्माची संस्कृती, आपला संप्रदाय, माझे कीर्तन माझी तुळशी माय अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी म्हणून मी बिग बॉसमध्ये गेले. मात्र, तिथं राहून मी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले. मी अभंगावर बोलले. ज्ञानेश्वरी वाचन तुळशी पूजन सोडले नाही. वारकरी संस्कृती जपली. पण, एक महिला कीर्तनकार आहे. म्हणून विरोध होत असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, शिवलीला पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे घराबाहेर झाल्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते; कीर्तनकार शिवलीला यांनी मागितली माफी