CNG production from biogas : साखर कारखान्यात बायोगॅसपासून सीएनजी उत्पादन करण्याचा प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी कारखान्यात यशस्वी झाला आहे. हा देशातला पहिला प्रयोग असावा. या कारखान्यातून रोज 5 टन सीएनजी उत्पादन होत आहे.  या उपपदार्थामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनामागे 50 ते 100 रूपये अधिक भाव मिळू शकतो. याच कारखान्यात ट्रॅक्टर सीएनजीवर चालवण्याचेही परीक्षण यशस्वी झाले आहे. असे सीएनजी महाराष्ट्रातल्या किमान 75 साखर कारखान्यात करता येवू शकेल, असा दावा केला जात आहे.  


डिस्टीलरी स्पेंट वॉशपासून बायोगॅस आणि बायोगॅसचे शुद्धीकरण करून CNGतयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी कारखान्यात बी बी ठोंबरे यांच्या पुढाकाराने हा प्रयोग यशस्वी होऊ शकला आहे. 


साखर कारखान्यातला उपपदार्थ म्हणून पर्यावरणपूरक तसेच भविष्याचे इंधन म्हणून बायोसीएनजीला मोठी मागणी आहे. 100 KLPD क्षमतेच्या डिस्टीलरीपासून साधारणपणे 5 हजार घन मीटर एवढा बायोगॅस बनतो. त्याच्या 60 टक्के प्रमाणे 3 हजार घन मीटर एवढा बायोसीएनजी तयार होवू शकतो. CNG ची किंमत प्रति किलो सरासरी 80 रूपये किलो आहे. अशा 25 ते 30 मेट्रीक टन क्षमतेच्या सीएनजी प्रकल्पापासून दररोज 20 ते 25 लाखाचे उत्पन्न होईल..


नॅचरल शुगरमध्ये रोज 5 टन सीएनजी


सध्या नॅचरल शुगरमध्ये रोज 5 टन सीएनजी तयार होत आहे. हा सीएनजी लातूरला पाठवला जात आहे.  सीएनजी बरोबरच नॅचरल शुगर पुढच्या गाळप हंगामापासून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर्ससाठी बायो-सीएनजी वापरणार आहे. सीएनजी ट्रॅक्टरचे परीक्षण झाले आहे.
 
नॅचरल शुगर मध्ये आणखी सीएनजी उत्पादन वाढवण्यात येणार आहे. कारखान्यावरचा सीएनजी पंप लवकरच सुरू होत आहे. कारखान्यांकडचा सीएनजी एचपीसीएल कंपनी विकत घेत आहे. या नव्या उपपदार्थामुळे शेतकऱ्यांना टनामागे 50 ते 100 रूपये अधिक देता येतील. असे प्रकल्प किमान 75 साखर कारखान्यात सूरू होवू शकतात. यामुळे सीएनजीसाठी सध्या लागत असलेल्या रांगा कमी होतील. पर्यावरणाचे रक्षण आणि शेतकऱ्यांना फायदा असे तिहेरी लाभ होईल, असंही सांगितलं जात आहे.