मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला असून 28 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान असलेला 'वर्षा' बंगला सोडावा लागणार आहे. फडणवीस दाम्पत्यांनी घरातील सामानाची आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे. असेच काहीसे बदल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कामकाजासंदर्भातही दिसून येत आहेत.




मुख्यमंत्री कार्यालयाचं अधिकृत ट्विटर हॅन्डल असणारं 'सीएमओ महाराष्ट्र' (CMO Maharashtra)या ट्विटर हॅन्डलचा प्रोफाईल फोटोही बदलण्यात आला आहे. या ट्विटर हॅन्डलला मंत्रालयाच्या इमारतीचा फोटो प्रोफाइल फोटो म्हणून ठेवण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या ट्विटर हॅन्डलला त्यांचा फोटो प्रोफाइल फोटो म्हणून ठेवण्यात आला होता. पण काल नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅन्डलचा फोटो बदलण्यात आला आहे.



देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या ट्विटर हॅन्डललाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रोफाइल फोटो ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पदावर रूजू असणाऱ्या वैयक्तिक व्यक्तीचं ट्विटर हॅन्डल आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्विटर हॅन्डल दोन्ही वेगवेगळे असतात. ट्विटर हॅन्डलवरून एक वाद काँग्रेस आणि भाजप यांमध्येही दिसून आला होता.

2014मध्ये ज्यावेळी भाजपला बहुमत मिळालं आणि नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून निवड झाली त्यावेळी, पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल नव्या पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे सोपवताना त्या ट्विटर हॅन्डलचे नाव बदलले आणि ट्विट्सही डिलीट केले. एका अज्ञात व्यक्तीने मूळ यूजरनेम वापरून आपलं ट्विटर अकाउंट सुरु केलं. यावर काँग्रेस अधिकाऱ्यांवर भाजप अधिकाऱ्यांनी 'कृतघ्न, अनैतिक आणि बेकायदेशीर' असं ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला होता.


दरम्यान एका अधिकाऱ्याने, हे ट्विटर हॅन्डल @PMOIndia हे वैयक्तिक हॅन्डल नाही. हे भारताच्या पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत हँडल आहे, असं सांगितले. त्यानंतर @PMOIndia या अकाउंटवरून '26 मे 2014 पर्यंत या खात्यावरील सर्व ट्वीट संग्रहित केले गेले आहेत आणि पुढील लिंकवर तुम्ही पाहिले जाऊ शकतात.' असं ट्वीट करून सांगण्यात आलं.

संबंधित बातम्या : 

पंतप्रधान म्हणून मोदींनी लहान भावाला साथ द्यावी : सामना

गोव्यात नक्कीच राजकीय भूकंप होईल : संजय राऊत

जगेन असं वाटत नव्हतं पण सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो : छगन भुजबळ