मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक महिना चार दिवस झाल्यानंतर अखेर महाराष्ट्राला पर्मनंट मुख्यमंत्री मिळाला आहे महिन्याभराच्या सत्ता संघर्षानंतर महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालं. परंतु या दरम्यान भाजप- शिवसेना युती तुटली. युती तुटल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेचे बिनसले आहे, पण नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदी यांची आहे, असे आवाहन सामानाच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात, अशा सूचक टोलाही देण्यात आला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहिली मंत्रिमंडळ बैठक घेत काही निर्णय देखील घेतले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सेनेचे मुख्यमंत्री झाला असला तरी 'ये इश्क नहीं आसाँ, आग का दरिया है और तैर के जाना है', अशी शिवसेनेची स्थिती असणार आहे. सध्या राज्यासमोर अनेक मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशातच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून राज्यातील लहान भावाला म्हणजेच मुख्यमंत्र्यांना साथ द्यावी, असं आवाहन सामानातून केलं आहे.
काय आहे अग्रलेखात?
महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी जनता दिल्लीशी झुंजली. संघर्ष केला. संघर्ष आणि लढे आमच्या पाचवीलाच पुजले आहेत. दिल्ली देशाची राजधानी जरूर आहे, पण महाराष्ट्रही दिल्लीश्वराचा गुलाम नाही हा बाणा दाखविणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा बाणा आणि सरकारचा कणा ताठ राहील यात्री खात्री बाळगायला हरकत नाही.
राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज
पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील. पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
केंद्राची भूमिका
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेचे बिनसले आहे, पण नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदी यांची आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात हे सूत्र ठेवले तर जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या सरकारविषयी मनात राग-लोभ का ठेवायचा? महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचा मान दिल्लीने ठेवावा व सरकारच्या स्थैर्याला चूड लागेल असे काही घडू नये याची काळजी घ्यावी. महाराष्ट्र म्हणजे चालता बोलता पुरुषार्थ! हा पुरुषार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मातीच्या कणाकणात दिसत असतो.
काडीमात्रही गय न करता
गळ्यातील ताईतही जरासा वाकडा वागला तर त्याची काडीमात्रही गय न करता दुर्गुण त्यांनी जेथल्या तेथे ठेचून काढले. हे राज्य जनतेचे आहे व ते 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी जनता दिल्लीशी झुंजली. संघर्ष केला. संघर्ष आणि लढे आमच्या पाचवीलाच पुजले आहेत. दिल्ली देशाची राजधानी जरूर आहे, पण महाराष्ट्रही दिल्लीश्वराचा गुलाम नाही हा बाणा दाखविणाऱया बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा बाणा आणि सरकारचा कणा ताठ राहील यात्री खात्री बाळगायला हरकत नाही. महाराष्ट्रास छत्रपती शिवरायांनी जे दिले त्यात स्वाभिमान महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र दिल्लीस सर्वाधिक पैसा मिळवून देतो. देशाचे अर्थकारण मुंबईवर चालले आहे. देशाला सर्वाधिक रोजगार मुंबईसारखी शहरे देत आहेत. देशाच्या सीमांवर महाराष्ट्राचे जवान शहीद होत आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण हे तर महाराष्ट्राचे पिढीजात कर्तव्यच आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर आता अन्याय होणार नाही व सन्मान राखला जाईल याची काळजी नव्या मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र चौथ्या-पाचव्या रांगेत उभा राहणार नाहीच, तर अग्रभागी राहून तो कर्तृत्व गाजवील असे परंपरा सांगत आहे. याच परंपरेचा भगवा ध्वज महाराष्ट्राच्या विधानसभेवर, मंत्रालयावर फडकला आहे. भगव्या ध्वजाशी वैर घेऊ नका. वैर घ्याल तर स्वतःचेच नुकसान करून घ्याल. महाराष्ट्रात सुराज्याचा उत्सव सुरू झाला आहे. बघता काय? सामील व्हा!
पंतप्रधान म्हणून मोदींनी लहान भावाला साथ द्यावी : सामना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Nov 2019 09:52 AM (IST)
सध्या राज्यासमोर अनेक मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशातच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून राज्यातील लहान भावाला म्हणजेच मुख्यमंत्र्यांना साथ द्यावी, असं आवाहन सामानातून केलं आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -