मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षेबाबतचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता पंतप्रधानांनी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नियंत्रक संस्थांना आवश्यक सूचना द्याव्यात आणि या नियंत्रक संस्थांनी त्यानुसार मार्गदर्शक सूचना जारी करुन परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्बत करावं असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. या व्यावसायिक अभ्यासक्रमात अभियांत्रिकी, लॉ अभ्यासक्रम, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने व्यावसायिक आणि अव्यसायिक या दोन्ही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून ज्याला परीक्षा देण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याचा शासन निर्णय जारी केला होता. पण यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्य सरकारने त्यांच्या पातळीवर रद्द केल्या तरी त्याला शिखर संस्थांची परवानगी मिळणं आवश्यक असते. पण ही परवानगी न मिळाल्याने या परीक्षाबाबतचा रद्द करण्याचा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला तरी याचा तिढा अद्याप कायम आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रात लिहिताना सांगितलं, "राज्यातील सध्याची कोरोनाची स्थिती पाहता या परीक्षा, वर्ग घेण्यासाठी हे वातावरण अनुकूल नाही. जर या परीक्षा घेतल्या तर जिल्हा, महापालिका प्रशासन, शिक्षण विभाग, परिवहन, विद्यार्थी पालकांसाठी हे काम अधिक कठीण होईल. मी आपल्याला याआधी सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, यासाठी विनंती केली होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीनंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला असला, तरी व्यवसायिक अभ्यासक्रमाबाबत त्या त्या शिखर संस्थांची मंजुरी मिळावी जे सुद्धा आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन(AICTE), बार काऊन्सिल ऑफ इंडिया (BCI), काऊन्सिल फॉर आर्किटेक्चर(COA), नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट यासारख्या शिखर संस्थांना आपण सूचना देऊन त्यांना परीक्षा रद्द करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे काढण्याबाबत सांगावे," अशी विनंती आहे.
युजीसीने जारी केलेल्या गाईडलाइन्समध्ये देशभरातील विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा 1 ते 31 जुलै दरम्यान घेण्यात यावी असं सांगण्यात आलं होतं. मात्र, मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागात कोरोनाचा संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या परीक्षा घेण्यास समर्थता दर्शवत, राज्य सरकारने या व्यवसायिक आणि अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना लिखित परीक्षा द्यायची अथवा नाही हे विद्यापीठाला द्यायचे आहे. जे विद्यार्थी परीक्षा देणार नाहीत त्यांना विद्यापीठांनी ठरवलेल्या सूत्रानुसार गुण देऊन पदवी दिली जाणार आहे.