सिंधुदुर्ग/रत्नागिरी : अगदी परदेशात किंवा गोव्यातील समुद्रकिनारी दिसणारे बीच शॅक्स तुम्हाला यापुढे कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही पाहायला मिळणार आहे. विश्वास बसत नाही? पण, हो हे खरं आहे. राज्य मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या 1 सप्टेंबरपासून पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील आठ ठिकाणी सागरी किनाऱ्यांवर हे बीच शॅक्स उभारले जाणार आहेत.


कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. स्वच्छ, निळाशार समुद्र, मनमोहक आणि हिरवाईने नटलेला परिसर नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. आता गोव्याच्या धर्तीवर कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही प्रायोगिक तत्त्वावर शॅक्सची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला तर चालना मिळणार आहे. शिवाय, स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार आहे. यामध्ये 80 टक्के स्थानिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे.


1999 मध्ये सरकारने सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली या दोन समुद्र किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. तर रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे आणि गुहागर या ठिकाणी 1 सप्टेंबर 2020 पासून हे बीच शॅक्स उभारले जाणार आहेत.


महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने, पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल. त्यामुळे या बीचेसवर पर्यटकांना मर्यादित स्वरुपात बीअर, जेवण, चहा आणि नाश्ता मिळणार आहे.


गोवाच्या धर्तीवर बीच शॅक्सची उभारणी करताना




  • - एका चौपाटीवर कमाल 10 शॅक्स उभारता येतील. या शॅक्सचे तीन वर्षाकरता वाटप करण्यात येईल. त्यांचा आकार 15 फूट लांबी आणि 15 फूट रुंद आणि 12 फूट उंच असेल.

  • - गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद छत टाकता येईल. कुटी मिळणाऱ्या व्यक्तीकरता परवान्यासाठी 15 हजार रुपये अर्जाचे ना परतावा मूल्य असेल.

  • - तसेच या शॅक्सकरता पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार वार्षिक शुल्क राहिल. याशिवाय 30 हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल. तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ती परत केली जाईल.

  • - सकाळी 7 ते संध्याकाळी 7 यावेळेत ही शॅक्स खुली राहतील. याबाबतचे सारे नियम हे पर्यटन विभागानेन आखून दिलेले असतील.


दरम्यान, या साऱ्या बाबी असल्यातरी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षीही येतात. तसेच शंख, शिंपले आणि समुद्री जैवविविधतेने हे किनारे नटलेले आहेत. त्यामुळे बीच शॅक्स ही संकल्पना राबवताना याबाबतची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.