कोल्हापूर: कोल्हापूर पोलिसांनी (kolhapur police) मोठी कारवाई करत आलिशान गाड्या चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून कोट्यावधी रुपयांच्या तब्बल 31 आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 


बेळगाव कारागृहातून वाहन चोरीचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कोल्हापूर पोलिसांनी केला आहे. ए. डी. नावाच्या नार्कोटिक्स गुन्ह्यात जेलची हवा खात असलेल्या व्यक्तीकडून ही टोळी चालवली जात होती. देशातील सर्व भागात या टोळीचे नेटवर्क होते. कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहन चोरीची एक तक्रार दाखल झाली होती. या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर पोलीस करत होते. त्यावेळी कोल्हापूर पोलिसांना या टोळीविषयी माहिती मिळाली.  त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. 


या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन आसाम, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि दिल्ली येथून चोरी  करण्यात आलेल्या 31 आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. 


दरम्यान, देशरात ही टोळी कार्यरत असून आलिशान गाड्या चोरणाऱ्या या टोळीत आणखी काही आरोपींचा समावेश आहे का? याचा तपास कोल्हापूर पोलीस करणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.


पोलिसांना बक्षीस जाहीर 
देशातील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी 35 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha




महत्वाच्या बातम्या