मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्यांनी राज्यातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर निवेदन ट्वीट करण्यात आलं आहे. हे माझं एकट्याचं यश नाही तर सहा महिन्यात हे राज्य पुढे नेण्यासाठी साथ देणाऱ्या प्रत्येकाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांच्या लोकप्रियतेबाबत आयएएनएस आणि सी व्होटर्सने संयुक्तरित्या सर्व्हे केला आहे. या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाचव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपशासित राज्यातील एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही.


उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत, आयएएनएस आणि सी व्होटर्सचा सर्व्हे


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवेदन:


लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे, हे महत्त्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे.


महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी या सर्वांचे आभार! अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नाही.


सगळ्यांचा नम्र,
उद्धव बाळासाहेब ठाकरे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य





उद्धव ठाकरेंची लोकप्रियता 76.52 टक्के
आयएएनएस आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के आहे. तर देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक अव्वल स्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता 82.96 टक्के एवढी आहे.

आयएएनएस-सी व्होटर्स सर्व्हेतील टॉप 5 मुख्यमंत्री
नवीन पटनायक (ओडिसा) - 82.96 टक्के
भुपेस बघेल (छत्तीसगड) - 81.06 टक्के
पी. विजयन (केरळ) - 80.28 टक्के
जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश) - (78.52) टक्के
उद्धव ठाकरे (महाराष्ट्र) - 76.52 टक्के