सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुणी काय केलं आणि कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोकणाची संपत्ती आपल्याला जगासमोर न्यायची आहे. कोकणचं कॅलिफोर्निया करु असं अनेकजण म्हणायचे. बाळासाहेब म्हणाले होते, कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा भारी बनवा. कोकणच्या विकासानं आजपासून भरारी घेतली आहे. या विमानतळामुळं अनेकांना लाभ होणार आहे, असं ते म्हणाले. 


मुख्यमंत्री म्हणाले की, पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं असा टोला त्यांनी लगावला. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. पण कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली. नारायणराव आपण लघु उद्योग खात्याचे मंत्री आहात पण केंद्रीय मंत्री आहात. विकासकाम आपण नक्की कराल, असं ते म्हणाले. 


Narayan Rane : मुख्यमंत्र्यांना उद्देशून नारायण राणे म्हणाले, 'उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनं मी इथं विकासकामं केली'


आज आनंदाचा क्षण आहे. अशा क्षणी कुठलंही राजकारण नको- नारायण राणे 


यावेळी नारायण राणे म्हणाले की, आज आनंदाचा क्षण आहे. अशा क्षणी कुठलंही राजकारण नको. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या या हेतूने मी इथं आलो आहे. विमानं पाहिलं आणि खूप बरं वाटलं. देश विदेशातून पर्यटक सिंधुदुर्गात यावे आणि व्यवसाय वाढून आर्थिक समृद्धी व्हावी असं वाटतं, असं ते म्हणाले. 


Chipi Airport : विमानतळाचं लोकार्पण, मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री नारायण राणे कित्येक वर्षांनी आमनेसामने, मंचावर नेमकं काय घडलं?


माझा जन्म सिंधुदुर्गातील आहे. मात्र मी मुंबईत आलो. मला बाळासाहेबांनी पुन्हा इकडं पाठवलं. मी आलो आणि निवडूनही आलो. इथं खूप समस्या होत्या मात्र मी बाळासाहेबांच्या प्रेरणेनं इथं विकासकामं केली. साहेबांच्या आशिर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. मी कोकणात विकासाची अनेक कामं केली पण मला त्याचं श्रेय घ्यायचं नाही, ते श्रेय बाळासाहेबांचं आहे की ज्यांनी मला संधी दिली, मी निमित्तमात्र होतो, असंही ते म्हणाले.


नारायण राणे म्हणाले की, गोवा हायवेच्या कामात कंत्राटदारांना कोण अडवतं? असा सवाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राणेंनी केला. राणे म्हणाले की, आमचं भागवा आणि काम सुरु करा अशी भूमिका कुणी घेतली ते आज मंचावर उपस्थित आहेत, असंही राणे म्हणाले. राणे म्हणाले की, विमानतळ झालंय मात्र बाहेरचे रस्ते खराब आहेत. इथले लोकप्रतिनिधी काय करतात याची चौकशी करण्यासाठी कुणीतरी नेमा, असंही ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले. आदित्य ठाकरे हे माझ्यासाठी टॅक्स फ्री आहेत. तर विनायक राऊतांनी पेढ्याचा गुणधर्म आत्मसात करावा असंही राणे म्हणाले.


उद्धव ठाकरे आणि नारायण राणे शेजारी शेजारी बसले


एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खुर्ची लावण्यात आली होती तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री पवार बसले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उपस्थित होते.


Sindhudurg Chipi Airport LIVE : चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा, लाईव्ह अपडेट्स


यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि राणे यांनी सोबत दीपप्रज्वलन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन झाले.  पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले.


विमानात काय काय झालं ? 


शिवसेनेचे आमदार मंत्री मागच्या बाजूला होते. तर भाजपचे आमदार, नेते, राणे पुढच्या रांगेत होते. विमानप्रवासात मराठीत घोषणा  झाली तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि जयघोष केला. विमान सुरु होताच खासदार विनायक राऊतांनी पेढे वाटले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विनायक राऊतांनी पेढे दिले. “गोड घ्या आणि गोड गोड बोला” असं विनायक राऊतांनी राणेंना म्हटलं. राणेंनीही आपणही गोड गोड बोलावं असा संवाद झाला.



डिजीसीएकडून सर्व परवानग्या


तत्कालीन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने 2018 साली गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर गणेशाची मूर्ती घेऊन विमानाचे टेस्ट लँन्डिंग झाले होते. त्यानंतर सुरेश प्रभूही विमानाने त्या धावपट्टीवर उतरले होते. पण त्यावेळी सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पूर्ण नसल्याने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडून विमानतळास परवानगी मिळाली नव्हती. आता विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने डिजीसीएकडून सर्व परवानग्या मिळाल्याने विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज झाले.