मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अशातच विधानसभेत मनसुख हिरण प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. तसेच अधिवेशनात मनसुख हिरण प्रकरण खूप गाजलं होतं. अशातच हिरण प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला असून क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आल्याची घोषणाही गृहमंत्र्यांनी केली आहे. 


"सर्वांची गैरसोय झालेली आहे. आज विधीमंडळाचं अधिवेशन समाप्त झालं, कोरोनामुळे आव्हानात्मक होतं. पण कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी सहकार्य केलं. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या अर्थसंकल्पावर आज चर्चा झालेली आहे. हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर हे अधिवेशन समाप्त करण्यात आलं असून पुढच्या अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली आहे. एकूणच गेले 10 दिवस जे काही झालं, त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात." असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


"महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन संपलं असून कोरोनाच्या संकटात हे अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. विरोधी पक्षानेही उत्तम सहकार्य केलं. यापूर्वी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आम्ही तुमच्याशी संवाद साधला होता. आताच्या आवाहनात्म परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही." , असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 


सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय : मुख्यमंत्री


मनसुख हिरण प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "आत्महत्या, मृत्यू झाल्यावर दखल घेण्याचं काम सरकारचं आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नावं आहेत. जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास सुरु आहे. आधी फाशी द्या मग तपास करा याला अर्थ नाही. ही सरकारची पद्धत नाही. अजून एक नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचं आणि चारित्र्यहनन करायचं, हे आम्ही नाही करणार. एवढं झाल्यावरही मनसुख हिरण यांच्या मृत्यूची दखल आम्ही घेतली. सचिन वाझे म्हणजे, ओसामा बिन लादेन असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण जो सापडेल त्याला दया माया दाखवणार नाही." पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "मनसुख हिरण मृत्यूप्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार; तर सचिन वाझे यांचा सध्या शिवसेनेशी कोणताही संबंध नाही." 


नाणार रिफायनरीवरुन आम्ही भूमिका बदललेली नाही : मुख्यमंत्री 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "नाणार रिफायनरीवरुन आम्ही भूमिका बदललेली नाही. स्थानिक जनतेचा विरोध होता. आम्ही जनतेला बांधिल आहोत, जनतेचा विरोध आहे. तेव्हाच भूमिका जाहीर केली. नाणार व्यतिरिक्त दुसऱ्या जागेला स्थानिक लोकांनी पाठिंबा दिला तर तिथे प्रकल्प होईल. हित म्हणजे, पैसे नाही पर्यावरणाचा विषय आहे."


"कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचा विषय कोर्टात आहे. कांजूरमार्गला कारशेड करणं भविष्याच्या दृष्टीने हिताचं आहे. आता जागा प्रस्तावित आहे. तिथे कारशेड करत आहोत. कोर्टात न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. कारशेड केलं तर तीन लाईन कारशेड मिळेल.", कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :