मुंबई : महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून बोगस बियाणे विक्री करणारांविरोधात कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   बोगस बियाणांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी अपार कष्ट करुन बियाणं पेरतो आणि ते उगवत नाही. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्यावर कारवाई होणार. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्याकडून वसूली करुन नुकसानभरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकरी मरमर राबून, अफाट मेहनत करून अन्न पिकवतोय आपल्यासाठी. त्या संदर्भात बी - बियाणं बोगस असल्याच्या तक्रारी येणे हे दुर्दैवी आहे. मेहनत करून पीक आलं नाही तर काय करणार? मी शेतकरी दादाला सांगतो, काळजी करू नका, असंही ते म्हणाले.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातून बोगस  बियाणांच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसुल केली जाईल.

हेही वाचा- CM Uddhav Thackeray | 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे

ते म्हणाले की, एक तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करु. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करुन त्यांना सलाम करुयात, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. योगायोगाने 1 तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकरी दिन आहे जो आपले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ साजरा करतो. त्यांना अभिवादन करुन शेतकर्‍यांना, अन्नदात्याला सलाम करतो, धन्यवाद देतो. परवा 1 तारीख आहे, त्या दिवशी आपल्यासाठी लढणार्‍या सर्व डॉक्टर्स चा दिवस आहे. मी त्यांना धन्यवाद देतो व आपण त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहु असे वचन देतो.



बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती. या वृत्ताची दखल औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून खंडपीठाने यावर सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.  मराठवाड्यातील  परभणी, नांदेड,,लातूर , हिंगोली आणि  अहमदनगर जिल्ह्यांमध्ये बनावट सोयाबीन बियाणे विक्री झाली. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सोयाबीनची अनेक ठिकाणी उगवणच झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

बोगस बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्या तसेच ते विक्री करणारे यांच्या विरोधात बियाणे निरीक्षकांकडे तक्रार देऊनही आवश्यक कारवाई न झाल्यास पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आणि त्या अनुषंगाने पोलिसांना कारवाईचे अंतरिम निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे आणि न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले आहेत.

एबीपी माझाने लागवडीनंतर सोयाबीन उगवण झालीच नसल्याचे वृत्त प्रसारित केले होते. त्याची दखल घेत खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. प्रकरणात अॅड. पी. पी. मोरे यांची अमायकस क्युरी (न्यायालयाचा मित्र) म्हणून नेमणूक करण्यात आली असून याचिकेवर एका आठवड्याने सुनावणी ठेवण्यात आली आहे.



मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका.

बोगस बियांणाच्या तक्रारी येत आहेत हे दुर्देवी.

उरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्ती दिली जाणार.

मी आषाढी वारीला पूजेसाठी जाणार. विठुरायाला साकडं घालण्यासाठी मी जाणार आहे.

दहिहंडी उत्सव स्वताहून रद्द केला. ही खरी सामाजिक जाणीव.

गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद

विसर्जनाची किंवा प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढू नका

मूर्ती लहान करण्याचा निर्णय कौतुकास्पद

प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करणारं देशातलं सर्वात मोठं राज्य महाराष्ट्र असेल

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढं यावं

लढणं हे आपल्या रक्तात आहे, आता रक्तदान करुन आपला लढाऊपणा सिद्ध करा

रेमडेसिवीर आणि अन्य औषधं मोफत उपलब्ध करुन देणार

चेस द व्हायरस ही संकल्पना मुंबईत सुरु

अद्याप कोरोनाचं संकट टळलेलं नाही

अर्थचक्राला गती दिल्यानंतर कोरोना संख्या वाढणारच आहे

ज्येष्ठ डॉक्टरांनी काळजी घेऊन काम करावं

पाऊस आला की नवचैतन्यासोबत काही समस्याही घेऊन येतो, मात्र आपली तयारी सुरु आहे

या दिवसात अन्य रोगांचीही भीती आहे, त्यामुळं काळजी घ्या

उद्योजकांसाठी महाराष्ट्राचं दार उघडं, संकटामध्ये उद्योजकांना महाराष्ट्र आपला वाटतो. तुम्ही या पण भूमिपुत्रांना रोजगार द्या

शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर