मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांनी एनसीबी आणि भाजप नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केल्या आहेत. नवाब मलिकानी थेट एनसीबीच्या समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत. त्यामुळे सुरुवातीला फ्रन्टफूटवर असणारी एनसीबी आता बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिकांचे गुड गोईंग असं म्हणत कौतुक केल्याचं समजतंय.
नवाब मलिकांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात मोहिम उघडली आहे. त्यातून ते रोज नवनवे खुलासे करत आहेत. त्यांच्या या खुलाशामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. नवाब मलिकांच्या या लढ्याचं कौतुक आता खुद्द मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांनी केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी नवाब मलिक यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे.
नवाब मलिकांनी घेतलेली भूमिका पुढे सुरु ठेवावी असं अशी सूचना खुद्द मुख्यमंत्र्यांनी केल्याचं समजतंय. त्यामुळे एनसीबीच्या पाठिंब्यासाठी एकीकडे भाजप रस्त्यावर उतरलं असून दुसरीकडे नवाब मलिकांच्या पाठिंब्यासाठी राज्य मंत्रिमंडळ आता सरसावलं असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. नवाब मलिक म्हणाले की, "बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं सुरु होता. बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचं रॅकेट चालवत होते त्याला तत्कालीन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता. खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचं काम समीर वानखेडेंनीच केलं. खोट्या नोटांच्या केसचे इंचार्जही समीर वानखेडेच होते"
महत्त्वाच्या बातम्या :
- खोट्या नोटांच्या रॅकेटला तत्कालीन फडणवीस सरकारचा पाठिंबा, केसेस कमकुवत करण्यात वानखेडेंची मदत : नवाब मलिक
- Nawab Malik Live : देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, नवाब मलिकांचा आरोप
- Sameer Wankhede Case : नवाब मलिकांच्या विरोधात समीर वानखेडेंच्या वडिलांची पोलिसांत तक्रार