मुंबई : राज्यात रोज आरोपांची चिखलफेक होतेय, महाराष्ट्रावर राजकीय चिखलफेकीचा डाग लागतोय. त्यामुळे कोणीतरी महत्वाच्या व्यक्तीने यामध्ये लक्ष घेऊन हे थांबवावं असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्याची चिंता असलेले मुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे यामध्ये पुढाकार घेऊ शकतात असंही ते म्हणाले. 


देशातील माणसांना कालपर्यंत असं वाटत होतं की महाराष्ट्रात चरस, गांजा, अफूचं पीक निघतंय. आज असं वाटतंय की गुंड, बदमाश, दाऊदच्या माणसांशी संबंध असलेल्या लोकांचं राजकारण चालतंय असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राची सुरु असलेली बदनामी कुठतरी थांबवावी असंही संजय राऊत म्हणाले. 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "राज्यात रोज आरोपांची चिखलफेक होत आहे. ज्यांनी आरोपांची परंपरा सुरु केली त्यांचीच आता पळताभूई होतेय. सध्याच्या राजकारणामध्ये कुणीही कोणाकडे बोट दाखवू नयेत. निवडणुका जिंकण्यासाठी राजकारणाची पातळी खालावली. महाराष्ट्रावर राजकीय चिखलफेकीचा डाग लागतोय. भाजपने ही नौटंकी बंद करावी."


एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा
राज्यातील एसटी कर्मचारी आणि संपावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कोरोना काळात एसटीचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढला, त्यातून संकट निर्माण झालं. महाराष्ट्रासारखं राज्य हे कधीही कष्टकऱ्यांच्या कामाला, त्यांच्या इमानीशी गद्दारी करणार नाही. एखाद्या संपामुळे लोकांचे हाल होत असतील तर कर्मचाऱ्यांनीही त्याचा विचार करावा. त्यांनी संप मागे घ्यावा."


एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी भाजपच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये गेल्यानंतर भ्रष्ट माणसं शुद्ध होऊन येतात. भाजप सध्या बाहेरच्या लोकांना हायजॅक केला. हायजॅक करणाऱ्या लोकांनी अजून काय हायजॅक केलं काय सांगता येत नाही. भडकलेल्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न हे बाहेरुन आलेले नेते करत असून जुने भाजपचे नेते करत नाहीत." 


नवाब मलिकांच्या कुटुंबियांवर आरोप करण्यात आले, ते कोणत्या परिस्थितीतून गेले आहेत ते आम्ही जवळून पाहिलं आहे. त्यांचे आरोप संतापातून येत आहेत असंही संजय राऊत म्हणाले.