Nawab Malik on Devendra Fadnavis :  देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी (Nawab Malik) पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं. हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो, याच्या दुसऱ्या पत्नीवर खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असांना त्यांच्या कार्यालयातून फोन गेला, असाही आरोप मलिकांनी केला. 


नवाब मलिकांनी म्हटलं की, 2005  साली मी मंत्रीपदावर नव्हतो.  सलीम पटेलचा मृत्यू झालाय ही माहिती मला ५ महिन्यांपूर्वी मिळाली आहे.  सलीम पटेलचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्यांवरुन सलीम पटेलनं त्यावेळी अनेक माध्यमांवर डिफमेशन दाखल केले होते, असं मलिक म्हणाले. 


दाऊदच्या निकटवर्तीयांनी मलिकांच्या कुटुंबियांच्या कंपनीला जमीन विकली; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट


मलिकांनी यावेळी म्हटलं की, जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं. मात्र महाराष्ट्रातून खोट्या नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 मध्ये  इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये   छापेमारी झाली. ज्यात 14 कोटी 56 लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या. या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले, असं ते म्हणाले. 


काल काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस


काल बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला होता की, दाऊदच्या निकटवर्तीयांनी मलिकांच्या कुटुंबियांच्या कंपनीला जमीन विकली. तसेच कुर्ल्यातील कोट्यवधींची जमीन केवळ 30 लाखांमध्ये कशी खरेदी केली? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता.  देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले होते की, "काही दिवसांपूर्वी मी एक घोषणा केली होती. काही गोष्टी दिवाळीनंतर मी तुम्हा सर्वांसमोर मांडेल. पण काहीसा उशीर झाला. कागदही गोळा होत होते. काही लोकांच्या पत्रकार परिषदांचे दिवस आधीच बुक होते. म्हणून मला थोडासा वेळ लागला. मी जे सांगणार आहे तो अत्यंत गंभीर आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडीत मुद्दा आहे. सर्वात आधी मी दोन पात्रांबाबत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातील एक म्हणजे, सरदार शाह वली खान. हा 1993 बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार आहे. याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि सध्या ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यांच्यावर आरोप होता की, टायगर मेमनच्या नेतृत्त्वात हा फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्चेंज आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा? या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी त्यानं केली होती. तसेच टायगर मेमनच्या घरी बॉम्ब स्फोटाचं जे कारस्थान झालं होतं, त्या सर्व बैठकांना हा उपस्थित होता. तसेच टायगर मेमनच्या घरातील गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं, त्यामध्येही हा सहभागी होता." "या प्रकरणातील दुसरं पात्र म्हणजे, मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस आहे. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी आर. आर. पार्टी एका इफ्तार पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर एका दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला होता. तो माणूस म्हणजे, सलीम पटेल.", हे सांगताना आर. आर. पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, फोटोमुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस. दाऊची बहिण हसीना पारकरचे ते चालक होते." "कुर्ल्यामध्ये एलबीएस रोडवर जवळपास 3 एकराची जागा आहे. एलबीएस रोडवर अगदी महागडी जागा होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक कुटंबाच्या कंपनीला जमीन विकली. या कंपनीच्या वतीनं जागेच्या कागदपत्रांवर फराज मलिक यांनी सही केली आहे. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. काही काळ स्वतः नवाब मलिकही या कंपनीचे डायरेक्टर होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी सॉलिडस कंपनीला ही जागा केवळ 30 लाख रुपयांना विकली आहे. कुर्ल्यातील जवळपास तीन एकर जमीन 30 लाखांना विकली. तर याचं पेमेंट केलंय 20 लाखांचं. आजही त्या ठिकाणी एक मोठं शेड सॉलिडस कंपनीनं भाड्यानं दिलेलं आहे.", असं ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "मला मिळालेल्या माहितीनुसार, आजही एक कोटी महिना या जागेचं भाडं सॉलिडसला मिळतंय, असंही फडणवीस म्हणाले होते.