Sameer Wankhede vs Nawab Malik : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर केलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्य माहितीनुसार, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव के वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोघात ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ज्ञामदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एससी/एसटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. आर्यन खान क्रूझ प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्या कारवाईवर नवाब मलिक यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या फैरीमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. 


समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मानहानीची याचिकाही दाखल केली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं नबाव मलिक यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवाब मलिक सोशल मीडियावर धडाधड उत्तर देत आहेत, तर अपेक्षा आहे की इथंही ते पटापट उत्तर देतील असा टोला लगावत नवाब मलिकांना मंगळवारपर्यंत यावर उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आहे.





नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांच्याकडूनही त्यांना उत्तरं दिली जात आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आरोप म्हणजे, जातीच्या बोगस दाखल्याद्वारे समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा हा होय. तसेच समीर वानखेडे जन्मानं मुस्लीम आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे नसून दाऊद वानखेडे असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मलिकांच्या या आरोपाविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक कोटी 25 लाख रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे.  


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचं विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. वानखेडे हे भ्रष्ट असल्याचं सिद्ध करण्यासाठी मलिक यांनी त्यांचा जन्म दाखला, पहिल्या विवाहाचे फोटो व वडिलांचं दुसरं नाव असे तपशीलही जाहीर केलेत. समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. तसेच वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. त्यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे. मलिक यांचे हे आरोप वानखेडे कुटुंबियांनी फेटाळल्यानंतरही मलिक यांनी नवनवे आरोप आणि खुलासे करणं सुरूच ठेवलंय. नुकताच त्यांनी समीर वानखेडेंच्या मेव्हणीवर म्हणजेच क्रांती रेडकरच्या बहिणीवरही ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल सावल उठवलेत. त्यामुळे संतापलेल्या ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. मलिक हे रोज नवनवे आरोप करत असून ते सर्व आरोप हे चुकीचे, निराधार आहेत. मात्र, या सगळ्यांमुळे आमची नाहक बदनामी होत असून कुटुंबियांची प्रतिमा मलिन होत आहे.