CM Uddhav Thackeray Konkan Visit : तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. आज मुख्यमंत्री नुकसानीचा आढावा घेणार आहेत. रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत. अशातच रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, असं म्हणत नुकसानग्रस्त भागातील जनतेला एकप्रकारे मदतीचं आश्वासनच दिलं आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून नाहीतर जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे. 


येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसेच कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मला कोणत्याही परिस्थितीचं राजकारण करायचं नाही, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलं आहे. 


मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, "कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. सर्वात आधी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतरच ठरवणार आहे." अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही योग्य मदत करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील नुकसानीचा आढावा घेत आहेत. मात्र मुख्यमंत्री अवघ्या चार तासांचा दौरा करून मुंबईला परतणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच चार तासांच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, "मी हेलिकॉप्टरमधून नव्हे जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करायला आलेलो नाही." 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


CM Uddhav Thackeray Konkan Visit LIVE : मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याचे सर्व अपडेट्स केवळ एका क्लिकवर...