मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्तानं वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचं ऑनलाईन पद्धतीने थिम साँग लाँच करण्यात आलं. मानेच्या मणक्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिल्याचं दिसून आलं. 


शस्त्रक्रियेनंतर  जवळपास अडीच महिन्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिले. शिवाजी पार्कवरच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर, निर्भया पथकाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला हाणला. उपस्थिती आभासी असली तरी पाठिंबा प्रत्यक्ष आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टोमणा मारला. शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरेंनी कोणत्याही कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजर राहणं टाळलं होतं. अनेक कार्यक्रमांना त्यांनी ऑनलाईन हजेरीच लावली होती. त्यावरुन भाजपनं नेहमीच मुख्यमंत्र्यांना लक्ष केलंय. आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना अप्रत्यक्ष उत्तर दिलंय.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी स्पाईन सर्जरी करण्यात आली होती. स्पाईन सर्जरीनंतर ते आतापर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठका, कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना 2 डिसेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात, शासकीय बैठकांना प्रत्यक्षपणे अनुपस्थित राहत असल्याने भाजपने टीकाही केली होती. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले होते. 


विधानसभा अधिवेशनात अनुपस्थिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता यंदाचे विधीमंडळ अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहतील असे म्हटले जात होते. मात्र, हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडले होते. विधीमंडळ अधिवेशना दरम्यान कोरोनाबाधित कर्मचारी, आमदार आढळल्याने मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात उपस्थित न राहण्याची विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.  


महत्त्वाच्या बातम्या :