Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपचे नेते  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दोन वेळा फोन केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे-फडणवीस यांच्यात 21 जून रोजी चर्चा झाल्याचं सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंनी भाजप श्रेष्ठींनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून मात्र या सर्व गोष्टी भूलथापा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी 20 जूनच्या रात्री डॅमेज कंट्रोल करण्याचा पहिला प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीयांच्या फोनवरुन देवेंद्र फडणवीस यांना फोन करण्यात आला. पक्षामध्ये विभाजन होण्यापेक्षा, गुवाहाटीला गेलेले आणि मुंबईत राहिलेले आमदार, असं विभाजन न होता, हे सर्व एकत्र राहून भाजपसोबत पुन्हा शिवसेनेची युती होते का? यासंदर्भात चर्चा झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. 


जाणून घेऊन या सर्व घडामोडींचा घटनाक्रम 


- 20 जूनला विधानपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार नॉट रिचेबल असल्याची कुणकुण लागली.


- उद्धव ठाकरेंच्या टीमने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं. काहीतरी मोठं घडू शकतं अशी चाहूल लागली. रात्री बारा-साडेबाराच्या सुमारास तब्बल 15 ते 20 आमदारांना संपर्क करण्यात आला. पण ते नॉट रिचेबल असल्याचं कळलं. मग समजलं की एकनाथ शिंदे आणि काही आमदार संध्याकाळपासून ठाण्यावरुन सूरतच्या दिशेने रवाना झाले. त्यावरुन चित्र स्पष्ट झालं की हे आमदार काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहेत.


- संपर्क होत नव्हता म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपल्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा करुन संपूर्ण माहिती घेतली. यातून बाहेर कसं येऊ, एकत्र येऊ का, काही मार्ग निघतो का, असा थेट प्रश्न उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना विचारला.


- रात्री दीडच्या सुमारास संजय राठोड, दादा भुसे यांच्यासह पाच-सहा आमदार वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्याच वेळी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील देखील वर्षावर होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरुन बोलणं झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यासोबतच चर्चा केली.


- सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण लढलं पाहिजे असं म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोलचा किंवा एकत्र येण्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं की आपण लढू शकतो. त्यामुळे पुढे बोलणं झालं नाही. 


- दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. संध्याकाळी ते जनतेला संबोधित करणार होते, त्याला उशीर झाला होता. त्याचं कारण होतं की संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तिथे उपस्थित होते. त्यांच्यात खलबतं झाली, त्यात उद्धव ठाकरेंना राजीनामा देऊ नका असा सांगण्यात आलं. 


- त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये भाजप पक्षश्रेष्ठींसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचं पक्षश्रेष्ठींशी बोलणं झालं की नाही हे समजू शकलेलं नाही. 


या निव्वळ भूलथापा, कोणीही गैरसमज करून घेऊ नये : शिवसेना
सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आहे, अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचंय, ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  


भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत : सुधीर मुनगंटीवार 
भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं वक्तव्य पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. सोबतच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या संवादाची आम्हाला कल्पना नाही, असं स्पष्टीकरणंही त्यांनी दिलं आहे.