पंढरपूर : टाळ-मृदंग आणि विठ्ठल नामाने पंढरपूर दुमदुमू लागलंय. आषाढीनिमित्त संध्याकाळपर्यंत पालख्या आणि दिंड्या पंढरीत दाखल होणार आहेत. मात्र या भक्तीरसाने गरजणाऱ्या पंढरपुरात मराठा मोर्चाही सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरासह अनेक शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पंढरपुरात दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासह इतर अनेक मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा, यासाठी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे. लाखो वारकरी पंढरपुरात येणार असल्याने कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. दुसरीकडे सरकार आणि काही वारकऱ्यांकडूनही या सोहळ्याला गालबोट लागू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र ठिकठिकाणची आंदोलनं आणि पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांवर होणारी दगडफेक यामुळे वारकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राज्यभरातून पंढरपूरकडे येणाऱ्या 16 बसेस फोडण्यात आल्या आहेत. या बसमधून प्रामुख्याने वारकरीच प्रवास करतात. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. सध्या पंढरपुरात सात लाख वारकरी दाखल झाले आहेत. संध्याकाळपर्यंत हा आकडा बारा ते पंधरा लाखांपर्यंत जाऊ शकतो. पालख्या आता वाखरी मुक्कामी आहेत, दुपारच्या जेवणानंतर निघतील आणि रात्री आठ वाजेपर्यंत पंढरीत दाखल होतील. यावेळी पहिल्यांदाच मुंबई पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.