मुंबई/उस्मानाबादः तुळजाभवानीच्या मुख्यद्वारातून प्रवेश देण्यासाठी अखेर राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. गर्दीचे दिवस वगळता भाविकांना आता मुख्यद्वारातून प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि आमदार यांच्या बैठकीनंतर येत्या दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

 

तुळजापूर मुख्यद्वार प्रवेश प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुख्यद्वारातून प्रवेश देण्याचं आश्वासन दिलं आहे. भाविकांनी मुख्यद्वारातून प्रवेश मिळण्यासाठी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडलं होतं. प्रवेश मिळेपर्यंत गणपती विसर्जन करणार नाही, अशी अट आंदोलकांनी घातली होती.

 

भाविकांनी बंद पाळला आणि सात दिवस आंदोलन केलं. मात्र त्यानंतरही तोडगा न निघाल्याने भाविकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची जोरदार मागणी केली. यावेळी पालकमंत्री दीपक सावंत यांवी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही भाविकांनी आंदोलन तीव्र केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन प्रशासनाने न पाळल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा भाविकांनी दिला आहे.