मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये विविध खात्यांसह एकूण 38 निर्णय घेण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठीच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी हे महत्त्वाचे निर्णय सरकारकडून घेण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात आणि देशातील देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण आणि गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून गोमातेसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना यापुढे "राज्यमाता- गोमाता" (Rajyamata Gomata) म्हणून घोषीत करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे. 


पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर


प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना "कामधेनू" असे संबोधण्यात आलंय. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ.) तथापि, दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.


देशी गाय "राज्यमाता- गोमाता" घोषित करण्याच्या निर्णयाला मंजूरी 


देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पुर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व विचारात घेता, देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. उपरोक्त पार्श्वभुमी विचारात घेवून, पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस "राज्यमाता- गोमाता" घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आज हा निर्णय घेण्यात आला आहे. 


शासन निर्णय काय?


देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे "राज्यमाता- गोमाता" म्हणून घोषीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०९३०१०३०१७४३०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि  नावाने हा आदेश असल्याचेही त्यात सांगण्यात आले आहे.