CM Eknath Shinde : अयोध्या दौऱ्यावरून मुंबईत परत येताचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. आयोध्येत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन (Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Bhavan) बनवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना मी भेटलो, त्यांनी स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांसह विविध योजनांबद्दल चर्चा झाली. तसेच महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणावर रामभक्त अयोध्येला जातात. त्यांची योग्य सोय तिकडे झाली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जागा देण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे लवकरच आयोध्येमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यावर राम भक्तांना दिली. 


अयोध्येतील राम मंदिर हे भारतीयांसाठी अस्मिता असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. राम मंदिर हे स्वप्नवत होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा राम मंदिराचे स्वप्न पाहिलं होतं, असे शिंदे म्हणाले. राम जन्मभूमीत वेगळंच वलय जाणवल्याचं शिंदे म्हणाले. आजचा दिवस माझ्या जीवनातील सौभाग्याचा दिवस आहे. मी आजचा दिवस कधीच विसरु शकणार नाही, असंही शिंदे म्हणाले. 


असा होता मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केलं. रविवारी दिवसभरात निर्माणाधीन अयोध्येतील राम मंदिराची  पाहणी केल्यानंतर सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भूसे, गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. आरतीसाठी शरयू नदीच्या तीर फुलांनी सजवण्यात आला होता. महाआरतीनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. दौऱ्याचे आयोजन करणाऱ्यांचे त्यांनी विशेष करून आभार मानले. लखनऊपासून अयोध्येपर्यंत वातावरण निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्या दौरा यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दौरा आयोजित करण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाचे आभार मानले. 


शिंदे-आदित्यनाथ यांची बंद दाराआड चर्चा 


अयोध्या दौरा आटपून मुख्यमंत्री शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे दोघांमध्ये 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. भेटीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्र दौऱ्याचं निमंत्रणही दिलं. बंददाराआड झालेल्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाणा आलंय. दरम्यान, शिंदेंसह राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, संजय कुटे यांनी देखील योगी आदित्यनाथांची भेट घेतली.