Thane Lok Sabha Constituency : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना, ठाणे लोकसभेची जागा नक्की कुणाकडे हा सगळ्यात मोठा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे. ठाणे लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कमालीचे आग्रही आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे शिवसेना देखील सोडायला तयार नाही. त्यामुळे महायुतीमधील जागावाटपाचा तिढा आणखीनच वाढतांना पाहायला मिळत आहे.
ठाणे लोकसभेत आमची ताकद जास्त आहे, अपक्ष आमदार गीता जैनदेखील आमच्यासोबतच आहेत, ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आमच्या नगरसेवकांची ताकद जास्त आहे असे म्हणत ठाण्याची जागा आम्हाला सोडा अशी भाजपची मागणी आहे. दुसरीकडे ठाणे माझ्या घरातला मतदारसंघ आहे, तो आम्हालाच सुटला पाहिजे अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याची माहिती मिळत आहे. पण ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत न आल्यामुळे ठाणे लोकसभेची जागा स्वतःला सोडवून घेण्यात शिंदेंसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. राज्यातील इतर सगळ्या जागांचा तिढा सुटताना दिसत आहे, मात्र ठाणे लोकसभा नक्की कुणाकडे या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नाही.
ठाण्यातील महायुतीची ताकद...
ठाणे लोकसभेची ताकद पाहिल्यास मंदा म्हात्रे, गणेश नाईक आणि संजय केळकर हे भाजपचे तीन आमदार आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आमदार आहेत. तर गीता जैन या अपक्ष आमदार आहेत. तसेच, शिंदे यांचा गड म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. पण आमची देखील ताकद ठाण्यात वाढली असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे ठाण्याच्या जागेवरून महायुतीचा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उमेदवारी मिळताच राजन विचारे करणार जल्लोष...
एकीकडे महायुतीचा ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरत नसल्याचे चित्र आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीत ठाकरे गटाने खासदार राजन विचारे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. तर, विचारे यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल शिवसैनिक आणि खासदार राजन विचारे यांच्याकडून जल्लोष केला जाणार आहे. शिवजयंती निमित्त ठाण्यातील मासुंदा तलाव येथील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाणार आहे. तर, टेंभी नाक्यावरील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :