पंढरपूर : सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने हजारो किलोमीटरची वाट पायदळी तुडवत येणाऱ्या वारकऱ्यांच्या आनंदांचा आज खऱ्या अर्थाने परमोच्च बिंदू. आषाढी एकादशीनिमित्त परंपरेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा पार पडली.

 

 

गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळाचं संकट झेलणाऱ्या महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् कर, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठुरायाकडे घातलं.

 

 

मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगरचे वारकी दाम्पत्य हरिभाऊ आणि सुनीता फुंदे यांनाही शासकीय पुजेचा मान मिळाला होता. या दाम्पत्याने विठ्ठल-रुक्मिणीची षोडषोपचार पुजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

या पुजेनंतर विठूरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भक्तांसाठी दर्शनाची वाट मोकळी करुन देण्यात आली. विठ्ठल-रखुमाईचं साजिरं-गोजिरं रुप डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांची अक्षरश झुंबड उडाली आहे. 'आम्हा लेकरांची तू विठू माऊली'च्या जयघोषात अख्खी पंढरी न्हाहून निघाली आहे.