अक्कलकोटजवळ जयंती एक्सप्रेसच्या इंजिनला आग, रेल्वे वाहतूक विस्कळीत
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2016 04:54 PM (IST)
सोलापूर: सोलापूरजवळ अक्कलकोट तिलाटी स्टेशनदरम्यान कन्याकुमारी-मुंबई जयंती एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, वेळीच ही आग विझवण्यात रेल्वे यंत्रणेला यश आल्यानं मोठी जीवितहानी टळली. रेल्वे इंजिनला आग लागल्यानं जयंती एक्सप्रेस अक्कलकोट तिलाटी स्थानकादरम्यान थांबवण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या एक्सप्रेसच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अन्य गाड्यांवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. हुसेन सागर, यशवंतपूर, बसव एक्सप्रेस गाड्या उशीराने धावत असून मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस सुद्धा उशिराने धावणार असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान, होटगी स्टेशनवर जयंती एक्सप्रेसचं इंजिन बदलून लोहमार्ग खुला करुन रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे.