मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर, त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांनी, केंद्रीयमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. तर, प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन त्यांनी पदभार स्वीकारला. तेथेही मुख्य सचिवांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. त्यानंतर राज्यातील सर्वपक्षीय नेते, भाजप पदाधिकारी व कार्यकर्तेही त्यांचं अभिनंदन करत आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपला जय श्रीराम करुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणाऱ्या हर्षवर्धन पाटील (Harshvardhan patil) यांनीही त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी जुना फोटो शेअर करुन देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना भाजपमधून तिकीट मिळत नव्हते, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला आहे.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शरद पवारांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, महाविकास आघाडीतील नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. मविआचे बडे नेते देखील शपथविधीला हजर नव्हते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारंसघाचे आमदार अभिजीत पाटील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते.
हेही वाचा
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड