सोलापूर : सोलापूरमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणते ढग योग्य आहेत. त्या ढगांवर रासायनिक घटकांची फवारणी कधी करावी याचा अभ्यास सुरू आहे. सुमारे 100 कोटी रुपये बजेट असलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. या प्रकल्पासाठी परदेशातून आलेली विविध उपकरण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या आवारात बसवण्यात आली आहेत. वैज्ञानिक पर्जन्य छायेतीस ढगांचा अभ्यास करत आहेत.

सी बॅण्ड रडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रडारमधून पर्जन्य छायेतील ढगांवर आडव्या आणि उभ्या लहरी सोडल्या जातात. या लहरी ढगांना भेदून जी माहिती देतात त्यावर आधारित कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू होतील. दुष्काळी पट्ट्यातील ढगांचा, वातावरणाचा 24 वैज्ञानिकांची टीम अभ्यास करत आहे.

कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी ढगांवर सोडियम क्लोराईड किंवा कॅल्शियम क्लोराइड असे घटक फवारले जातात. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये असलेल्या या उपकरणांच्या सहाय्याने किमान दोनशे वेळा फवारणीचे प्रयोग करुन त्याचे निष्कर्ष मांडले जाणार आहेत. सोलापूर विमानतळावर दोन विमानं यासाठी तैनात करण्यात आली आहेत. प्राथमिक अभ्यासामध्ये पर्जन्य छायेतील ढगांमध्ये पाऊस पडण्याएवढी क्षमता असल्याचं दिसून आलं आहे. परंतु अभ्यासाचे पूर्ण निष्कर्ष हाती यायला वेळ लागेल.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा उपयोग करून कृत्रिम पावसासाठी पर्जन्यछायेच्या प्रदेशाची आलेली माहिती देशभरासाठी उपयोगी असणार आहे. पडलेल्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी करमाळा, तुळजापूर, उस्मानाबाद, अक्कलकोट ते कर्नाटकातील इंडीपर्यंत 120 पर्जन्य मापक यंत्र बसवलेली आहेत. सोलापूरचा 65 किलोमीटर परिघात हे प्रयोग केले जात आहेत. हवा मोजण्यासाठी चार टॉवर याठिकाणी आहेत.

सोलापुरातील हे केंद्र ढगांच्या अभ्यासासाठीचं केंद्र आहे. याठिकाणी पावसायोग्य ढग निश्चित करणे, ढगांवर रासायनिक द्रव्यांची फवारणी झाल्यानंतर पाऊस पडेपर्यंतचे निष्कर्ष पाहणे, असं काम चालतं. परंतु या केंद्राचा उपयोग करुन कृत्रिम पाऊस यावर्षी पाडला जाईल, असं सांगणं चुकीचं आहे.