बुलढाणा : जगात कोरोनाने हाहाकार माजविला असताना तिसरी लाट येणार असल्याचं तज्ञाच मत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याचंही भाकित तज्ज्ञांनी वर्तवलं आहे. असं असताना बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात 15 कोरोनाबाधित रुग्ण असताना तेथील स्वछता गृह एका चिमुरड्या 8 वर्षाच्या मुलाकडून हाताने साफसफाई करून घेण्यात आले. विशेष म्हणजे या मुलाला साफसफाई करण्यासाठी धमकविण्यात आलं. यामुळे या परिसरात प्रशासना विरोधात संतापाची लाट आहे.


हा मुलगा इयत्ता तिसरीत शिकत आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने मामाच्या घरी राहून हा मुलगा मामालाही काम करण्यात मदत करतो. परवा बुलढाणा जिल्हाधिकारी संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मारोड या गावात येतील या भीतीने पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या आदेशाने तात्काळ येथील विलगीकरण कक्षाची साफसफाई करण्याचा आदेश देण्यात आला. गावात कुणीही नसल्याने चक्क प्रशासनाने या बालकाला या विलगीकरण कक्षाच्या स्वछता गृहाची साफसफाई करण्यासाठी 50 रुपयांचं आमिष दाखवलं. बालकाने नकार दिल्यावर त्याला काठीने मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे बालकाने विलगीकरण कक्षात प्रवेश करून अक्षरशः हाताने टॉयलेट साफ केली. यावेळी विलगिकरण कक्षात 15 कोरोना बाधित रुग्ण हजर होते.


समाज माध्यमात या प्रकाराचा व्हिडीओ वायरल होताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. आज सुटी असल्याने उद्या जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना निवेदन देऊन या बाल मजुरीच्या प्रकाराबद्दल दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची भूमिका घेतली आहे. हा बालमजुरीचा प्रकार असून यात जिल्हाधिकाऱ्यांसह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचं ज्येष्ठ समाजसेवक भाऊ भोजने यांनी म्हटलं आहे.


या सर्व किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ वायरल झाल्यावर आम्ही संग्रामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पाटील यांच्याशी संपर्क करून घटनेबद्दल विचारणा केली असता या घटनेबद्दल मला अधिकृत माहिती नसून कशाला आमची सुट्टी खराब करता बातम्या लावून" असं बेजबाबदार उत्तर दिलं तर प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या घटनेबद्दल बोलण्यास तयार नाही. यामुळे लहान बालकांमध्ये कोरोना संक्रमण वाढण्यास बुलढाणा जिल्हा प्रशासन खत पाणी तर घालत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.