अहमदनगर : अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून एका अधिकाऱ्याकडे तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे. प्रेमाचे आमिष दाखवून अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून एका महिलेने तिच्या साथीदारांसोबत एका अधिकाऱ्याकडे ही खंडणी मागतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या साथीदारांना जेरबंद केले आहे.


अहमदनगरमध्ये एका महिलेच्या हनीट्रॅपमध्ये क्लासवन अधिकारी अडल्याची घटना घडली आहे. अहमदनगरमधील जखणगाव येथे ही खळबळजनक घटना घडली आहे.  महिलेने अधिकाऱ्यासोबत  प्रेमाचा बनाव केला आणि त्यानंतर अश्लील व्हिडीओ क्लिप तयार केली. महिलेने संबंधित अधिकाऱ्याकडे तब्बल 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नाही तर 80 हजार रुपये या महिलेने अधिकाऱ्याकडून वसूल केले. 


मात्र अधिकाऱ्याने धाडस दाखवून  अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन या महिलेविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून 1 महिला आणि 4 पुरुष अशा 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या महिलेने यापूर्वी देखील एका व्यावसायिकाला अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात अडकवून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान पोलिसांनी महिला आणि तिचे 2 साथीदार अमोल मोरे आणि सचिन खेसे यांना अटक केली आहे. 


दरम्यान अटक केलेल्या तिघांना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून उर्वरित फरार असलेल्या 2 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच या महिलेने आणखी कोणाकोणाला अशा प्रकारे ब्लॅकमेल केले आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.