पुणे : सहा वर्षांच्या चिमुरड्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थिनीला कर्कटकाने भोसकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. विशेष म्हणजे येरवडा पोलिसांनी वर्गशिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका शिक्षिकेवर ठेवण्यात आला आहे. येरवड्यातील इंग्रजी माध्यमाच्या एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला.


संबंधित सहा वर्षांच्या चिमुरडीला गंभीर जखम झाल्यामुळे तिची आई डॉक्टरांकडे घेऊन गेली होती. यावेळी ही जखम धारदार वस्तूमुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अखेर आईने खोदून विचारल्यावर चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

आपल्याच वर्गात शिकणाऱ्या मुलाने कर्कटकाने वार केल्याचा दावा विद्यार्थिनीने केला. आरोपी विद्यार्थी आणि जखमी विद्यार्थिनी इयत्ता पहिलीत शिकतात. दुपारी पाऊण ते दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

वर्गातील सर्वजण डान्स क्लाससाठी गेले होते, मात्र झोप आल्यामुळे संबंधित विद्यार्थिनी वर्गात बाकावर डोकं ठेवून बसली. त्यावेळी आरोपी विद्यार्थी तिच्याजवळ गेला आणि आपली पट्टी तोडल्याबद्दल तिच्यावर ओरडला. रागाच्या भरात कंपासपेटीतून त्याने कर्कटकाने तिच्यावर वार केले.

विद्यार्थ्याने तीन वेळा वार केल्यानंतर तिने आरडाओरडा केला. त्यानंतर शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी वर्गात धाव घेतली. रक्तस्राव थांबत नसल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जखमी विद्यार्थिनीच्या आईने येरवडा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सुरक्षेबाबत हयगय केल्याप्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला.