City Bank Scam : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Shiv Sena Ex MP Anandrao Adsul) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. मात्र अडसूळ दिल्लीला जाणार असल्यानं हजर राहाणार नाहीत अशी माहिती त्यांनी दिली आहे. सिटी कोऑपरेटिव्ह बँक बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची याआधीही चौकशी करण्यात आली होती. नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात...
काय आहे प्रकरण
आनंदराव अडसूळ हे को-ऑप क्षेत्रातील मोठं नाव आहे. राज्यातील सर्व सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांची युनियन आहे. आनंदराव अडसूळ हे गेल्या अनेक वर्षांपासून या युनियनचे नेतृत्व करतात. आनंदराव अडसूळ यांची ही स्वतःची सहकारी बँक होती. सिटी को-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अडसूळ अध्यक्ष होते. तर त्यांचे नातेवाईक हे संचालक मंडळावर होते.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, अडसूळ-राणांचे एकमेकांवर गंभीर आरोप
या बँकेचा टर्नओव्हर सुमारे 1 हजार कोटींच्या आसपास होता. मात्र ही बँक आता गेल्या दोन वर्षांपासून बुडीत निघाली आहे. कर्ज वाटपात अनियमितता आणि एन पी ए मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला आली आणि अखेर बुडीत निघाली. बँकेचे काही हजार सदस्य होते. अनेक पेन्शनर खातेदार होते. पण सारेच बुडाले.
खातेदारांनी, ठेवीदारांनी अनेकदा अडसूळ यांना भेटून काही तरी मार्ग काढण्याची विनंती केली. पण आनंदराव अडसूळ यांनी कुणाचंच ऐकलं नाही. यामुळे अखेर खातेदारांनी पोलिसात तक्रार केली. आपले पैसे परत मिळावेत म्हणून विनंती केली. मात्र, गेल्या दीड वर्षात खातेदारांना आपले पैसे मिळाले नाहीत. अनेक लोकप्रतिनिधींनी सीबीआय, आरबीआय, राष्ट्रपती यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
अखेर याची दखल ईडीने घेतली. सध्या ईडीकडून याच प्रकरणाची चौकशी सुरु आहे. याच अनुषंगाने अडसूळ यांच्या घरी आज सकाळी ईडी पोहचली आणि त्यांना समन्स दिला. याआधी ही ईडीकडून झालेल्या चौकशीत त्यांना या घोटाळ्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. ईडीच्या अधिकाऱ्याकडून त्यांची जवळपास 3 तास चौकशी करण्यात आली होती.
आनंदराव अडसूळ यांच्यावर कोणते आरोप?
आनंदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप आमदार रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली.
सर्वप्रथम घोटाळ्याची तक्रार स्वतः अडसुळांनी दिली
सर्वप्रथम या घोटाळ्याची तक्रार अडसूळ यांनीच दिली. त्यांची तक्रार ही पैशांच्या अपहाराची होती. कर्ज व बँकेने केलेल्या इतर काही ट्रान्स्फर्सच्या माध्यमातून अपहार झाल्याचा अडसुळांचाच आरोप होता. त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, अनेक केसेसमध्ये दिलेल्या कर्जाच्या तुलनेत बँकेने घेतलेले तारण हे अत्यल्प आहे. अडसुळांची तक्रार ही बँकेचे व्हेल्यूरस, ऑडिटर आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात होती. ही तक्रार मुंबई पोलिसात केली होती . नंतर ती ईओडब्ल्यूकडे तपासाला गेली.
काय म्हणाले आनंदराव अडसूळ
आनंदराव अडसूळ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, जे आरोप लावले आहेत त्या ऑडिट प्रकरणात मी, माझा मुलगा यांचा काही संबंध नाही. सकाळी ईडीचे अधिकारी आले होते. त्यांनी मला समन्स दिले. त्यांना मी सांगितलं की मी दिल्लीला जात आहे. मी याआधीच ईडी कार्यालयात जाऊन आलो आहे. रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या केसची सुनावणी आली की मला ईडीकडून समन्स पाठवण्यात येतं. रवी राणा यांनी हे सर्व मॅनेज केलं आहे. त्यांचं सरकार वर आहे, असा आरोपही आनंद अडसूळ यांनी केला. खातेदार, ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंघाने बॅंकेतील काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. मात्र बँकेचा टर्नओव्हर 800 कोटींचा असताना 900 कोटींचा घोटाळा कसा होईल असंही अडसूळ म्हणाले.
एबीपी माझाशी बोलताना अभिजित अडसूळ म्हणाले की, खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची तारीख असली की दरवेळी असे उपद्व्याप सुरू असतात. City Co-Operative बँकेत गैरव्यवहाराबाबत अगोदर आम्हीच तक्रार केली आहे.लक्ष विचलित करण्यासाठी ईडी चौकशीचा हा फार्स आहे, असं अभिजित अडसूळ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं.