पुणे : एकीकडे आयपीएलचा (IPL 2021) रोमांच शिगेला पोहोचला असताना आता आयपीएल सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याचा मोठा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या (pune police) आर्थिक गुन्हे शाखेने शहरात सुरू असलेला आयपीएल क्रिकेटवरील आंतरराष्ट्रीय सट्टा ओपन करत दोन बड्या बुकींना पकडले आहे. त्यांचे दुबई कनेक्शन समोर आले असून, दोघे राज्यातील सट्टा किंग आहेत.


IPL 2021 Point Table : बंगळुरुचं प्ले ऑफमधील आव्हान कायम तर मुंबई शेवटून दुसऱ्या स्थानावर, ऑरेंज,पर्पल कॅप कुणाकडे?


या दोघांकडून 92 लाख रुपयांची रोख रक्कम आणि ऐवज जप्त केला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. सट्टाकिंग गणेश भुतडा व अशोक देहूरोडकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा समर्थ पोलीस ठाणे व मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.



पुणे पोलिसांना मोठ्या प्रमाणावर आयपीएल सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या माहितीची पूर्ण खातरजमा करण्यात आली.नंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी नाना पेठ आणि मार्केटयार्डमध्ये छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली. दोन्ही ठिकाणावर 92 लाख रुपये रोख आणि 65 हजार रुपयांचा ऐवज मिळाला आहे. पोलिसांनी तो जप्त केला आहे.


दोघेही राज्यातील बडे बुकी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासात दुबई कनेक्शन मिळाले आहे. प्रमुख बुक्की दुबईत असून, त्याच्याकडे हे दोघे सट्टा पाठवत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान 
गणेश भुतडा हा देशातील एक बडा क्रिकेट बुकी म्हणून देखील ओळखला जातो. आता या दोघांकडून राज्यातील छोटे बुकी यांची माहिती मिळवली जात आहे. या कारवाईने प्रचंड खळबळ उडाली आहे.