नागपूर महापालिकेची आपली बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी आज सकाळी प्रशासन आणि पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. शहरातील यशवंत स्टेडियमजवळील डेपोमधून पोलिसांच्या बंदोबस्तात बस बाहेर काढल्या. मात्र भारतीय कामगार सेनेनं संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. तसंच मेस्माविरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे.
नागपूर महापालिकेच्या आपली बस सेवेचे चालक आणि वाहक कालपासून संपावर आहेत. त्यामुळे नागपूरकरांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. काल मेस्मा लागू झाल्यानंतर अनेक चालक आणि वाहक आज सकाळी डेपोत पोहोचले. दरम्यान भारतीय कामगार सेनेचे नेते संपावर ठाम आहेत.
दरम्यान पोलिसांनी बस सेवेत आडकाठी करणाऱ्या आणि संपावर ठाम असलेल्या संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेणं सुरु केलं आहे.
महापालिका बस सेवेच्या चालक वाहकांच्या संपामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे आज सकाळी हाल झाले. आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. त्यात बस सेवा बंद असल्याने नागपूरकरांना कालपासून त्रासही सहन करावा लागला.