रायगड : पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पसार झालेल्या नीरव मोदीच्या संपत्तीवर सीबीआय आणि ईडीची छापेमारी सुरुच आहे. नीरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील किहीम येथील आलिशान बंगला आणि दोन कार सीबीआयने सील केल्या आहेत.


नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्र किनाऱ्यालगत सुमारे 70 गुंठे जागेमध्ये आलिशान बंगला आहे. नीरव मोदीच्या या बंगल्यामध्ये 13 कर्मचारी काम करत होते. मंगळवारी दुपारी नीरव मोदीच्या बंगल्यावर मुंबईच्या सीबीआय पथकाने धाड टाकली.

रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या कारवाईनंतर नीरव मोदी याचा आलिशान बंगला सील करण्यात आला. या बंगल्यात असलेल्या दोन कारही सील करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सीबीआय अधिकारी आणि पोलिसांनी मात्र माध्यमांशी बोलणं टाळलं. तर, सील केलेल्या या बंगल्याची किंमत ही सुमारे 4 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नीरव मोदी कोण आहे?

नीरव मोदी भारतातील मोठा हिरे व्यापारी आहे, ज्याला भारतातील 'डायमंड किंग' असंही म्हटलं जातं. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्सच्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार नीरव मोदीची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.

नीरव मोदीची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्याने आपल्याच नावाने म्हणजे नीरव मोदी डायमंड ब्रँड नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केले आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदीचे 25 लग्झरी स्टोअर आहेत.

नीरव मोदीच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून ते 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नीरव मोदीच्या डायमंड ब्रँडची ब्रँड अम्बेसिडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदीच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदीचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदीने सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला.