31 डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्टला नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईतून नजीकच असणाऱ्या पनवेलच्या दिशेनं अनेकांचाच रोख असतो. शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळं इथं येणाऱ्यांची गर्दी कायमच जास्त असते. त्यातही नववर्ष, ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तर इथं गर्दी होणार हे नक्की.
शहरांतून इथं येणाऱ्यांकडून पनवेल तालुक्यातील विविध फार्महाऊसना पसंती दिली जाते. यामध्ये काही सेलिब्रिटींच्याही फार्महाऊसचा समावेश आहे. या भागात जवळपास 400 ते 500 फार्महाऊस असल्यामुळं पोलिसांनी 31 डिसेंबरच्या धर्तीवर या भागात चोख बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रामीण भागांत असणाऱ्या फार्महाऊसवर रात्रभर धिंगाणा चालू नये यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन हाती घेतलं जाणार आहे. 31 डिसेंबरच्या दरम्यान दोन - तीन दिवसांआधीपासूनच या भागात होणारी वर्दळ पाहता सर्व हालचालींवर पोलिसांची करडी नजर असेल.
पोलीस म्हणतात, है तैयार हम....
नव्या वर्षाच्या स्वगतासाठी या भागात शहरांतून अनेकजण जमतात. पनवेलच्या हद्दीत अनेक फार्महाऊस असल्यामुळं शहरी भागांतून इथं येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. कोविड परिस्थितीनुळं जे निर्बंध शासनानं आखले आहेत त्या अनुषंगानं त्या नियमांचं पालन करायचं आहे असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी तयार आहे.
थर्टी फर्स्टच्या धर्तीवर या भागातील फार्महाऊस मालकांशी आपल्या बैठका झाल्या असून, त्यांनाही सर्व निर्बंध आणि नियमांसंबंधीच्या सूचना देण्यात येणार असल्याचं पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं यंदाचा थर्टीफस्ट हा पोलिसांच्या नजरेतच जाणार आहे.