Coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 2020 या वर्षातील जवळपास सर्वच सण अगदी साधेपणानं साजरा करण्यात आले. आता अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळ अर्थात (Christmas 2020) या सणाच्या निमित्तानंही राज्यशासनाचं असंच काहीसं आवाहन जनतेला केलं आहे.


राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी सर्व ख्रिस्त धर्मीयांना यंदाचा नाताळ सण हा अगदी साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत.


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू, संचारबंदीचे हे नियम लागू असतील. शिवाय नाताळ सण साजरा करण्यासाठीही ठराविक नियमांचं सर्वांना पालन करावं लागणार आहे.


यंदाचा नाताळ साजरा करण्यासाठीचे नियम खालीलप्रमाणं...


- स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये 50हून जास्त जणांचा समावेश नसावा.


- कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी.


- सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणं अनिवार्य.


- चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक.


- चर्चमध्ये प्रभू येशुचं स्तुतीगीत गाण्यासाठी 10हून जास्त व्यक्तींचा सहभाग नसावा.


- स्तुतीगीत गातेवेळी वापरण्यात येणारे माइक स्वच्छ असण्याबाबत काळजी घ्यावी.


- 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांखाली लहान मुलांनी चर्चमध्ये आणि घराबाहेर जाणं टाळावं. याऐवजी यंदा त्यांनी घरातच हा सण साजरा करावा.


- कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणारे देखावे, आतिषबाजीचं आयोजन करु नये.


- 31 डिसेंबरला आभारप्रदर्शनासाठीचे मास आयोजित करतेवेळी वेळेचे निर्बंध पाळत मध्यरात्रीऐवजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास याचं आयोजन करावं.


नाताळ सणासाठी आखून दिलेल्या या नियमावलीचं पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या या युद्धात हातभार लावावा असंच जाहीर आवाहन करण्यात येत आहे.