चिपळूण :  22 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार (Maharashtra Rain) पावसामुळे चिपळूणच्या (Chiplun Flood) वाशिष्टी नदीला पुर आला आणि पुराचे पाणी शहरात शिरले. बघता बघता अख्खं शहर पाण्याखाली गेलं. जवळपास 17 तास पाण्याखाली शहर राहिल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. कुणी जीव मुठीत घेउन घराच्या छतावर तर कुणी पुराच्या पाण्यातून पोहत बाहेर निघत होते. त्यात बाजारपेठेत 12 फुटांवर पाणी चढल्याने बाजारपेठेतील दुकाने अक्षरशः पुराच्या पाण्याने उध्वस्त झाली. पुराचे पाणी ओसरल्यावर अनेक मंत्री महोदयांनी पुरपरिस्थिचा आढावा घेण्यासाठी चिपळूणचे दौरे केले. यात व्यापाऱ्यांना आश्वासनेही दिली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.



चिपळूण पुरग्रस्तांसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला मात्र दोन महिने उलटूनही पैसे काही पूरग्रस्तांना मिळाले नाहीत. याबाबत एबीपी माझाने बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर सरकारी विभागाला जाग आली असून आतापर्यंत 10 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप व्यापाऱ्यांना बॅंकेमार्फत करण्यात आले आहे. एबीपी माझावर प्रसारित केलेल्या बातमीमुळे आमच्या खात्यात पैसे पडले अशी भावना स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली. 



सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत दोन महिने उलटून गेलेत तरीही मदत मिळाली नव्हती. अजूनही अनेकांना मदत मिळालेली नाही.  प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, आमच्याकडे अजूनही पैसे वर्ग करण्यात आलेले नाहीत. व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं की,  अजूनही आमची दुकाने तशीच आहेत. आम्ही दुकान कुठुन सुरु करायचं. दुकानात माल कसा भरायचा. घरखर्च कसा चालवायचा या विवंचनेत आहोत, असं व्यावसायिकांनी म्हटलं होतं. 



व्यावसायिकांनी म्हटलं की, सर्व नेत्यांनी येउन आमचे अश्रू पुसण्याचे काम केले. आम्हाला आश्वासन दिले तुम्ही धीर धरा. तुम्हांला आम्ही योग्य तो न्याय देऊ, मदत करु, परत तुम्हांला उभंही करु. शासनाने मदतही जाहीर केली. त्यातली दमडी देखील आमच्या खात्यात जमा झाली नाही, असं व्यावसायिकांनी म्हटलं होतं. आम्हाला मदत नाही मिळाली तर आम्ही सर्व बाजारपेठ बंद ठेवून तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा व्यावसायिकांनी दिला होता.