Chinchwad By-election Results 2023: चिंचवड मतदार संघात लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) या 36,091 मतांनी विजयी झाल्या आहेत. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्याच तिरंगी लढाई होती. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नाना काटे यांच्यासाठी राष्ट्रवादीची फौज चिंचवडमध्ये तळ ठोकून होती. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी पुण्यात ठाण मांडलं होतं. मात्र तरीही लक्ष्मण जगताप यांचं मागील अनेक वर्षांचं काम पाहून लोकांनी अश्विनी जगताप यांना निवडून दिलं आहे.


कोण आहेत अश्विनी जगताप?


अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. अश्विनी जगताप या पहिल्यांदाच निवडणूक लढल्या. सातारा हे त्यांचं मूळ गाव आहे. त्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीसाठी उभे असताना त्या प्रचारात सक्रिय असायच्या. सामाजिक कार्यात तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतात.


जगतापांची उणीव भासत राहिल


अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झालेल्या दिवसांपासून त्या अनेकदा भावूक झाल्या होत्या. मतदानाच्यावेळी जगतापांची उणीव भासत राहिल असं त्यांनी अखेर बोलून दाखवलं होतं. दरवेळी लक्ष्मण जगताप यांना मत द्यायचे मात्र आज ते आपल्यात नाहीत. त्यामुळे मला लढावं लागत आहे. माझं मत कायम त्यांना असायचं आज मीच मला मत दिलं आहे असं म्हणत लक्ष्मण जगताप यांच्या आठवणीत त्यांचे डोळे पाणावले होते.


आईच्या प्रचारात लेक उतरली...


प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून अश्विनी जगताप यांची मुलगी ऐश्वर्या जगताप आणि दोन्ही मुलं प्रचारासाठी मैदानात उतरले होते. मुलांचं पहिलं मत आईलाच गेलं मात्र मुलांनी सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सगळा विजय वडिलांनी करुन ठेवलेल्या कामामुळे आहे. त्यांनी एवढे वर्ष जे काम केलं. कार्यकर्त्यांना जोडलं. त्यामुळे आमचा विजय पक्का होता आणि आज राष्ट्रवादीला हरवून आम्ही विजयी झालो आहोत, असं म्हणत जगताप कुटुंब भावूक झालं.


जगताप यांच्यापुढे अजित पवारांची जादू चालली नाही...


अश्विनी जगताप यांना पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार प्रचारासाठी चिंचवडमध्ये तळ ठोकून होते. त्यांच्यासोबतच महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. मात्र त्याचा काही उपयोग झालेला दिसला नाही, नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात महाविकास आघाडीची मतं विभागली गेल्याने नाना काटे पराभूत झाल्याचं बोललं जात आहे.