Ashish Deshmukh on Pune Bypoll: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत (Pune Bypoll) भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तब्बल 28 वर्षांनी भाजपचा (BJP) कसब्यात (Kasba Peth By-Election Results 2023) पराभव झाला आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) तब्बल 11 हजार 400 मतांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव केला आहे. याबाबत बोलताना काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच, पुण्यातील कसब्याच्या निवडणुकीत जे झालं तेच नागपूरच्या दक्षिण पश्चिम म्हणजेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात होईल, असा दावा काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेस नेते आशिष देशमुख हेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभे होते. 


...तर देवेंद्र फडणवीस यांचा पराभव शक्य : आशिष देशमुख


आज कसबाचा निकाल भाजपच्या विरोधात येताच आशिष देशमुख यांनी कसबा पेठ आणि दक्षिण पश्चिमच नागपूर या दोन्ही मतदारसंघाची राजकीय, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीत सारखीच असल्याचा दावा केला आहे. तसेच, दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये महाविकास आघाडीची एकी असल्यास देवेंद्र फडणवीस यांचा पराभव शक्य असल्याचा दावा केला आहे. आशिष देशमुख यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 


कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्या पाठीशी मतदार उभे राहिले. त्याच पद्धतीनं दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये 2019 मध्ये अगदी कमी कालावधीतही मतदार माझ्या पाठीशी उभे राहिले होते, असं वक्तव्य देखील आशिष देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असताना आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतानाही 2014 च्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांचं मताधिक्य कमी करु शकलो, असंही आशिष देशमुख म्हणाले आहेत. 


ज्या पद्धतीने नागपुरात शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ आणि इतर निवडणुकांमध्ये सातत्याने काँग्रेसचा महविकास आघाडीचा विजय होत आहे. त्याच ताकदीने एकत्रितपणे लढल्यावर पुढील निवडणुकीत नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातही महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल. कुठलाही उमेदवार दिला तरी तो निवडून येईल, असा दावाही आशिष देशमुख यांनी केला आहे.


28 वर्षांनी कसबा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटला


दरम्यान, तब्बल 28 वर्षांनी कसबा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटला आहे. कसब्यात महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांकडून भाजपच्या हेमंत रासनेंचा परभाव झाला. कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे.